पालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक 24 नोव्हेंबरला; अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 04:34 PM2017-11-14T16:34:18+5:302017-11-14T16:34:57+5:30

अंबरनाथ नगरपरिषद आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिका-यांनी जाहीर केली आहे.

Election to Municipal Corporation's municipal corporation on 24th November; Rabsikachch for the candidature in Ambernath and Badlapur | पालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक 24 नोव्हेंबरला; अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

पालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक 24 नोव्हेंबरला; अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

googlenewsNext

बदलापूर/अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद आणि कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिका-यांनी जाहीर केली आहे. 24 नोव्हेंबरला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 15 नोव्हेंबर असल्याने आता उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. ऑ

निवडणूक जाहीर झाल्यावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांची जुळवाजुळव करण्यासाठी अल्प कालावधी मिळाला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ हा संपल्याने या पदासाठी नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहे. अंबरनाथ पालिकेचे नगराध्यक्षपद हे पुढच्या अडीच वर्षाकरिता महिलांना राखीव आहे. तर बदलापूरचे पद हे अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

दोन्ही पालिकांमध्ये उमेदवारीसाठी शिवसेनेतच रस्सीखेच सुरू आहे. त्यातच जिल्हाधिका-यांनी निवडणुकीची तारीख ज्या पद्धतीने जाहीर केली आहे, त्या पद्धतीमुळे आता उमेदवार निश्चितीसाठी पक्षाकडे अवधी कमी शिल्लक राहिला आहे. 14 नोव्हेंबरला निवडणूक जाहीर झाल्यावर लागलीच 15 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दिली आहे. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक ही 24 नोव्हेंबरला असली तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अल्प कालावधी मिळाल्याने गणिते रचण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे.

15 नोव्हेंबरला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. वैध उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. तर वैध उमेदवारांपैकी माघार घेणा-या उमेदवारांना 20 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर 24 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता पालिका सभागृहात मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तर उपनगराध्यक्षपदाची निवडणूक 24 नोव्हेंबरलाच होणार असून, या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 24 नोव्हेंबरला सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत देण्यात आली आहे.

नगराध्यक्षपदाची निवडणूक झाल्यावर उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. वैध उमेदवारांची नावे जाहीर झाल्यावर 15 मिनिटांनी निवडणूक घेण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होणे ही अपेक्षित बाब असली तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एवढा अल्प कालावधी मिळेल याची कल्पना राजकीय पक्षांना नव्हती. त्यामुळे एका रात्रीत उमेदवार निश्चित करण्याची वेळ आता शिवसेनेसह भाजपावर येणार आहे. अंबरनाथ आणि बदलापुरात भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत असली तरी सत्ताधारी सेनेच्या नाराज गटाला सोबत घेऊन सत्तेची गणिते रचण्याची स्वप्न भाजपा पाहत आहे. त्यामुळे भाजपाच्या या रणनीतीला शिवसेना कशा पद्धतीने उत्तर देणार हे दुपारी 2 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

बुधवारी दुपारी भाजपाच्या गोटातून उमेदवारी अर्ज दाखल होतो की नाही याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर अंबरनाथमध्ये काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार की विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे सांभाळणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. बदलापुरात शिवसेनेच्या दोन गटातच उमेदवारीसाठी रस्सीखेच असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे कोणाच्या बाजूने कौल देणार यावर बदलापूरच्या पुढच्या राजकारणाची गणिते अवलंबून राहणार आहेत.

Web Title: Election to Municipal Corporation's municipal corporation on 24th November; Rabsikachch for the candidature in Ambernath and Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.