स्थायी सदस्य निवडीत भाजपने दाखवला ओमी टीमला ठेंगा; श्रीकांत शिंदे घडविणार किमया?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 01:05 AM2021-03-24T01:05:52+5:302021-03-24T01:06:15+5:30
उल्हासनगर पालिका : सभापती निवडणुकीत काढणार वचपा
उल्हासनगर : स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागी सोमवारी नवीन आठ सदस्यांची निवड झाली. या निवडीत भाजपने ओमी टीमला ठेंगा दाखविल्याने, सभापतीच्या निवडणुकीत वचपा काढण्याचे संकेत टीमकडून देण्यात आले.
महापालिकेच्या स्थायी समितीमधील १६ पैकी आठ सदस्य एक एप्रिल रोजी निवृत्त होत आहे. निवृत्त सदस्यांच्या जागी सोमवारी भाजपचे जमनुदास पुरस्वानी, टोनी सिरवानी, साई पक्षाचे गजानन शेळके, शिवसेनेचे रमेश चव्हाण, स्वप्निल बागूल, आकाश पाटील तसेच रिपाइं व राष्ट्रवादी पक्षाचे भगवान भालेराव, सुनीता बगाडे या आठ सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीत भाजपचे आठ, शिवसेना पाच, रिपाइं एक व राष्ट्रवादी पक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. साई पक्षाचा भाजपला पाठिंबा असल्याने समितीमध्ये भाजपचे बहुमत आहे. मात्र गेल्यावर्षी भाजपचे बहुमत असताना भाजप बंडखोर विजय पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा देऊन सभापतीपदी निवडून आणले होते.
भाजपने समिती सदस्यांमध्ये फूट पडू नये म्हणून पक्षाचे कट्टर सदस्य समितीत पाठविले. तर पक्षातील ओमी टीम समर्थक नगरसेवकांना ठेंगा दाखविला आहे. ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष पुरस्वानी म्हणाले की, पक्षातील ओमी टीम समर्थक नगरसेवकांना विशेष समिती सभापती पदासह प्रभाग समिती सभापतीपद दिले आहे. भाजपचाच सभापती निवडून येईल असा दावाही त्यांनी केला.
श्रीकांत शिंदे घडविणार किमया?
गेल्यावर्षी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी भाजपचे बंडखोर विजय पाटील यांना सभापतीपदी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगून, शिवसेना सदस्य सूचक, अनुमोदक राहिले. तसेच भाजपचे समिती सदस्य असलेल्या डॉ. प्रकाश नाथानी यांना आयुक्तांकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः नेऊन सदस्यपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यामुळे भाजप बंडखोर पाटील सभापतीपदी निवडून आले. तशीच किमया यावर्षी खासदार करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.