परिवहन सभापतीपदाची निवडणूक ५ एप्रिलला
By admin | Published: March 31, 2017 05:40 AM2017-03-31T05:40:18+5:302017-03-31T05:40:18+5:30
केडीएमसीच्या परिवहन सभापतीपदाची निवडणूक ५ एप्रिलला दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या वेळी पिठासीन
कल्याण : केडीएमसीच्या परिवहन सभापतीपदाची निवडणूक ५ एप्रिलला दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या वेळी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीसाठी सोमवार, ३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. यंदा सभापतीपदाची टर्म भाजपाची असताना शिवसेनाही उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही निवडणूकही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
परिवहन समितीत शिवसेना ६, भाजपा ५, काँग्रेस आणि मनसे प्रत्येकी १ असे पक्षीय बलावल आहे. फेब्रुवारी अखेरीस शिवसेनेचे दोन आणि भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य निवृत्त झाला. यानंतर झालेल्या सदस्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचे आणि भाजपाचे प्रत्येकी ३ सदस्य निवडून आले. त्यात मनोज चौधरी, संजय पावशे, मधुकर यशवंतराव हे शिवसेनेचे आणि भाजपाचे संजय राणे, प्रसाद माळी, कल्पेश जोशी यांचा समावेश आहे. दरम्यान, आता सभापतीपदाची निवडणुक जाहीर झाली असून, सभापतीपद कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
नेत्यांचे दावे-प्रतिदावे
सभापतीपद मागील वेळेस शिवसेनेकडे होते. यंदा त्यावर भाजपाचा दावा आहे. यासंदर्भात गटनेते वरुण पाटील म्हणाले की, ‘यंदाची सभापतीपदाची टर्म भाजपाची आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे.’ तर दुसरीकडे ‘महिला-बालकल्याण’चे सभापतीपद भाजपाला दिल्याने परिवहनचे सभापतीपद सेनेकडेच राहील, असे शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव म्हणाले.