मीरा भाईंदर महापालिकेत महापौर, उपमहापौर पदासाठी २६ फेब्रुवारीला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 08:46 PM2020-02-19T20:46:32+5:302020-02-19T20:46:50+5:30

भाजपा मध्ये चौघे इच्छूक तर मेहता गटाच्या रुपाली मोदी यांचे पारडे जड

Election for the post of Mayor, Deputy Mayor in Mira Bhayandar Municipal Corporation on February 3 | मीरा भाईंदर महापालिकेत महापौर, उपमहापौर पदासाठी २६ फेब्रुवारीला निवडणूक

मीरा भाईंदर महापालिकेत महापौर, उपमहापौर पदासाठी २६ फेब्रुवारीला निवडणूक

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी २६ फेब्रुवारी रोजी निवडणुक होणार असुन २४ रोजी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३ ते ५ अशी २ तासांची वेळ मिळणार आहे. महापौर पद अनुसुचीत जातीसाठी राखीव असल्याने भाजपातुन ज्योत्सना हसनाळे, दौलत गजरे, निला सोन्स व रुपाली मोदी असे चौघे इच्छुक असले तरी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक मोदी यांचे नाव निश्चीत मानले जाते. उपमहापौर पदासाठी देखील मेहता समर्थक ध्रुवकिशोर पाटील यांचे नाव असले तरी विद्यमान उपमहापौर चंद्रकांत वैती, रवी व्यास, सुरेश खंडेलवाल आदी या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर मेहता गटाचे वर्चस्व मोडुन काढण्यासाठी आमदार गीता जैन व त्यांचे समर्थक तसेच शिवसेना व कॉंग्रेसच्या भुमिके कडे देखील लक्ष लागुन आहे.

मीरा भार्इंदर महापालिकेत भाजपाचे ६१ , शिवसेनेचे २२ तर काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. भाजपा कडे स्पष्ट बहुमत असल्याने २०१७ सालचे महापौर पद इत्तर मागासवर्गिय प्रवर्गासाठी राखीव होते. त्यावेळी मेहतांनी त्यांची भावजय डिंपल मेहता यांची महापौर पदी वर्णी लावली होती. डिंपल यांना कामकाजाचा अनुभव नसल्याने उपमहापौर पदी चंद्रकांत वैती यांना संधी मिळाली होती. डिंपल यांची महापौर पदाची तर वैती यांची उपमहापौर पदाची मुदत २७ फेब्रुवारी रोजी संपणार आहे.

महापालिकेच्या सचीव कार्यालयाने सर्व नगरसेवकांना महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्र म पाठवला असुन सोबत अर्ज दिले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ३ ते ५ या वेळेत इच्छुकांचे अर्ज सचीव कार्यालयात स्विकारले जातील. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बावीकर यांच्या अध्यक्षते खाली महापौर पदाची निवडणुक होईल.

यंदाचे महापौर पद अनुसुचीत जाती साठी राखीव असल्याने या प्रवर्गातुन भाजपात ज्योत्सना हसनाळे, रुपाली शिंदे - मोदी, दौलत गजरे हे तीघेजण इच्छुक होते. पण भाजपाच्या निला सोन्स यांनी देखील अनुसुचीत जातीचा दाखला हाती येताच महापौर पदासाठी दावा ठोकल्याने भाजपात इच्छुकांची संख्या चार झाली आहे. निला ह्या मेहतांच्या विरोधक तर रुपाली ह्या कट्टर समर्थक मानल्या जातात. निला यांनी त्यांच्या मुलास मेहतांच्या सेव्हन सक्वेअर शाळेतुन काढल्याच्या विरोधात थेट उच्च न्यायालया पर्यंत दाद मागीतली होती. ज्योत्सना ह्या अनुभवी असल्या तरी मर्जीतला महापौर हवा म्हणुन रुपाली यांचे नाव निश्चीत झाल्याची चर्चा आहे. कारण महापौर डिंपल जरी असल्या तरी त्यांच्या दालनातील अ‍ॅन्टीचेंबर मध्ये मेहतांचा तळ आहे. त्यामुळे मर्जीतला महापौर असेल तर तळ कायम राहील असे समीकरण असल्याचे सूत्रांनी सांगीतले.

उपमहापौर पदासाठी चंद्रकांत वैती पुन्हा इच्छुक असले तरी त्यांचा पत्ता कापुन सद्याचे कट्टर मेहता समर्थक तसेच आमदार गीता जैन यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे ध्रुवकिशोर पाटील यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. उपमहापौर पदासाठी भाजपाचे रवी व्यास, सुरेश खंडेलवाल, मदन सिंग आदी देखील इच्छुक मानले जात असले तरी मेहतां कडुन त्यांची डाळ शिजु दिली जाईल या बाबत साशंकताच आहे.

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस व रविंद्र चव्हाण यांच्याशी मेहतांचे असलेले सलोख्याचे संबंध , मेहतांचे निकटवर्तिय मानले जाणारे भाजपाचे गटनेते हसमुख गेहलोत आदी कारणांनी मेहता सुचवतील तेच उमेदवार महापौर व उपमहापौर पदासाठी दिले जातील असे जवळपास निश्चीत मानले जाते. त्यामुळे स्थायी समिती, स्विकृत नगरसेवक तसेच अन्य समित्यां मध्ये सदस्य नियुक्तीत डावलण्यात आलेल्या आमदार गीता जैन यांना महत्वाच्या महापौर व उपमहापौर उमेदवारीत देखील डावलले जाणार असे स्पष्ट संकेत मेहतांच्या गोटातील सूत्रांनी दिले आहेत. त्यामुळे आ. गीता यांच्यासह शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या भुमिके कडे देखील लक्ष लागले आहे.

Web Title: Election for the post of Mayor, Deputy Mayor in Mira Bhayandar Municipal Corporation on February 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.