मर्जीतील कार्यकर्त्यांसाठी फिल्डिंग,परिवहन समितीच्या सहा जागांसाठी निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:15 AM2019-02-05T03:15:00+5:302019-02-05T03:15:34+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीच्या सहा जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. त्याकरिता, ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीच्या सहा जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. त्याकरिता, ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. समितीवर जाण्यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असून सोमवारपर्यंत २९ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दरम्यान, शिवसेना-भाजपामध्ये लोकप्रतिनिधींच्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांची समितीवर वर्णी लागण्याचे संकेत मिळत असल्याने निष्ठावंत इच्छुक कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीअखेर सभापती सुभाष म्हस्के यांच्यासह नितीन पाटील (दोघेही भाजपा) तसेच शिवसेनेचे राजेंद्र दीक्षित, संतोष चव्हाण, काँग्रेसचे शैलेंद्र भोईर आणि मनसेचे प्रल्हाद म्हात्रे असे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. या सदस्यांचा कालावधी फेब्रुवारीअखेरपर्यंत जरी असला तरी तत्पूर्वी त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी, १५ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. परिवहन समितीवर निवडून जाणाºया सदस्यांना चार वर्षांचा कालावधी मिळतो. त्यामुळे समितीवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. निवृत्त होणाºया सदस्यांमध्ये भाजपा आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, तर काँग्रेस आणि मनसेच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. नव्या सदस्यांची होणारी निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे.
शिवसेनेचे दोन सदस्य निवृत्त होत असले, तरी सध्या महापालिकेतील त्यांच्या लोकप्रतिनिधींची संख्या ५५ आहे. प्रत्येक सदस्याला सहा मते देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेनेचे तीन सदस्य सहजपणे समितीवर निवडून जाऊ शकतात. भाजपाचेही दोन सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांच्या लोकप्रतिनिधींचे ४७ संख्याबळ पाहता त्यांचे दोन सदस्य समितीवर निवडून जाऊ शकतात. तिसरा सदस्य निवडून आणण्यासाठी त्यांना शिवसेनेसह अन्य पक्षांच्या मतांची आवश्यकता भासणार आहे. इथे युतीचा धर्म पाळला गेला, तर शिवसेना-भाजपाच्या प्रत्येकी तीन सदस्यांची वर्णी समितीवर सहज लागू शकते.
मनसेचा समितीवरील एकमेव सदस्य निवृत्त होत आहे. त्यांना सदस्य निवडून आणण्यासाठी अन्य राजकीय पक्षांच्या मतांची आवश्यकता भासणार आहे. अन्यथा, परिवहन समितीवरील अस्तित्व संपुष्टात येईल. परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी डावलल्याने अन्य पक्षात जर नाराजी उद्भवली आणि कोणी बंडखोरी करून सूचक, अनुमोदक मिळवून निवडणूक लढवली तर याचा फायदा मनसेला होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वरिष्ठ नेत्यांना साकडे, धनदांडगेही शर्यतीत
परिवहन समितीसाठी इच्छुक असलेल्या तसेच नगरसेवकपदाच्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्यांची बोळवण केली जात असल्याने इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. परंतु, लोकप्रतिनिधींनी आपल्या मर्जीतल्यांची वर्णी समितीवर लागण्यासाठी फिल्डिंग लावल्याची सूत्रांची माहिती आहे.
सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करण्याऐवजी पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या, धनदांडगे परंतु मर्जीत असलेल्यांची वर्णी लावण्याचा चंग काही लोकप्रतिनिधींनी बांधल्याची माहिती मिळत आहे. यात सामान्य कार्यकर्ता नाराज होऊन त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटतील, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
कोअर कमिटी घेणार निर्णय : भाजपाचे जिल्हाध्यक्ष व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी कुठलीही निवडणूक असो भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवाराचे नाव सुचवले जाते. ही पूर्वीपासूनची परंपरा आहे. त्यामुळे मर्जीतल्यांना संधी दिली जाणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.