निवडणूक विशेष : राहूचा काळ, चंद्राचे स्थान अन् शनीचे बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 04:52 AM2019-03-31T04:52:15+5:302019-03-31T04:52:48+5:30
उमेदवार आध्यात्मिक गुरुचरणी : मुहूर्ताची लगबग, बोटात अंगठ्या तर मनगटावर गंडेदोरे
मुरलीधर भवार
कल्याण : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास येत्या मंगळवारपासून प्रारंभ होत असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शुभ-अशुभ योगाच्या मार्गदर्शनाकरिता आपापले आध्यात्मिक गुरू-बाबा-बुवा यांच्याकडे धाव घेतली आहे. राजकारणात प्रतिस्पर्धी पक्षातील राहू किंवा स्वपक्षातील केतू यांची पीडा लीलया निष्प्रभ करणारे उमेदवार अर्ज दाखल करताना आपापल्या कुंडलीतील ‘राहूकाळ’ मात्र अवश्य टाळतात. प्रत्येक उमेदवारांचे आध्यात्मिक गुरू हे वेगवेगळे असून त्यांच्या सल्ल्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
डोंबिवलीतील वेदमूर्ती ज्योतिषाचार्य ल.कृ. पारेकर यांनी सांगितले की, राजकीय मंडळी उमेदवारी अर्ज दाखल करताना राहूकाळ टाळतात. दिवसातून सात वेळा राहूची वेळ असते. ती टाळूनच शुभकार्य केले जाते. प्रत्येक उमेदवाराची पत्रिका, रास काय आहे, त्यानुसार त्याचा शुभमुहूर्त काढला जातो. त्यामुळे अमुक एका उमेदवारासाठी अमुक एक दिवस व त्यामधील विशिष्ट काळ हा शुभ असू शकतो. प्रत्येकाच्या राशी, नक्षत्रानुसार चांगला दिवस वेगवेगळा येऊ शकतो. याचबरोबर चौथ्या, आठव्या आणि बाराव्या चंद्राचे स्थान पाहिले जाते. चंद्र व गुरूचे बळ अर्ज दाखल करताना पाहिले जाते. राजकीय मंडळींचा शनी व रवी चांगला असावा लागतो. तो केव्हा चांगला आहे, याची खात्री करून ते शुभकार्याचा आरंभ करतात.
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल असून पक्षातील एखादा असंतुष्ट राहू-केतू बंडखोरी करून अर्ज दाखल करून राशीला येऊ नये, याकरिता अनेक मंडळी शेवटच्या दिवशी अर्ज भरतात. त्यामुळे बहुतांश उमेदवार हे दि. ८ अथवा ९ एप्रिल रोजी आपल्याला अनुकूल ग्रहमान केव्हा आहे, तेच पाहणार आहेत. ग्रहमान अनुकूल असले, तर अनुष्ठान करण्याची गरज नसते. मात्र, बहुतांश राजकीय व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनुष्ठान करतात. दोन ते तीन प्रकारचे अनुष्ठान केले जाते. त्याकरिता, वेळ पाहिली जाते. अनेक राजकीय नेते जाहीरपणे आम्ही काही मानत नाही, अशा वल्गना करत असले, तरी प्रत्यक्षात बहुतांश नेते हातामध्ये गुरू, शनी, पाचू असे खडे घालतात. बऱ्याचदा त्यांच्या आध्यात्मिक गुरूंनी हे त्यांना घालण्याचा सल्ला दिलेला असतो.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील एक उमेदवार साईभक्त आहेत, तर भिवंडीतील एका उमेदवाराचे कुलदैवत खंडोबा असल्याने तेथे नारळ फोडून ते उमेदवारी अर्ज भरण्याची चर्चा आहे. कल्याणमधील एक उमेदवार गादीचा आदेश आल्याशिवाय पुढचे पाऊल टाकत नाही.
मतदारसंघातील मतदारांवर जर एखाद्या आध्यात्मिक गुरूचा प्रभाव असेल, तर सर्वच उमेदवार त्या गुरूच्या आशीर्वादाकरिता जातात. प्रचाराच्या काळात मंदिर, मशीद, गुरुद्वारा वगैरे धार्मिक स्थळांवर माथा टेकण्याकरिता उमेदवारांना जावेच लागते.
पाच वर्षांत मतदारसंघात केलेल्या कर्माला धर्माची जोड दिली, तरच निभाव लागेल, यावर बहुतांश उमेदवारांचा विश्वास असल्याने निवडणूक काळात उमेदवारांच्या हातात गंडे, दोरे, तावीज, अंगठ्या, गळ्यात माळा वगैरे दिसते. अर्थात, एखाद्या मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांनी आपापल्या आध्यात्मिक गुरूंचे आशीर्वाद घेऊन, मुहूर्त काढून अर्ज दाखल केले, तरी लोकशाहीत मतदारराजा एकालाच देवासारखा पावतो, हे वास्तव नजरेआड करता येत नाही.