टीडीसीसी बँक अध्यक्ष, उपाध्यक्षासाठी आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:37 AM2021-04-12T04:37:59+5:302021-04-12T04:37:59+5:30
ठाणे : वर्षाकाठी साडेदहा हजार कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांची उद्या ...
ठाणे : वर्षाकाठी साडेदहा हजार कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांची उद्या निवड करण्यात येणार आहे. यासाठी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या बँकेच्या २१ संचालकांसाठी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये बँकेच्या सत्ताधारी संचालकांनी सहकार पॅनल तयार केले होते. प्रतिस्पर्धी महाविकास परिवर्तन पॅनल तयार करूनही पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. सहा संचालकांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे केवळ १५ संचालकांसाठी ही निवडणूक पार पडली होती. यात सत्ताधारी सहकार पॅनलकडे १८ संचालक आहेत. उर्वरित तीन संचालक राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांचे पुरस्कृत प्रत्येकी एक संचालक निवडून आला आहे. पण बँकेवर सहकार पॅनलचे सर्वाधिक बहुजन विकास आघाडी, भाजप व अन्य दोन मित्रपक्षांचे संचालक आहेत. त्यामुळे या पॅनलकडून आधीपासून बँकेच्या सत्तेवर दावा केला आहे. दोन्ही पदांसाठी एकपेक्षा अधिक अर्ज आल्यास मतपत्रिकेच्या मदतीने मतदान करणार आहे. यानुसार दुपारी ही निवड प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे हौसारे यांनी सांगितले.