ठाणे परिवहन समितीची निवडणूक लांबणीवर

By admin | Published: June 10, 2015 02:40 AM2015-06-10T02:40:15+5:302015-06-10T02:40:15+5:30

वर्षभर रखडलेल्या ठाणे परिवहन समितीच्या सदस्यांच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंजूर होऊनही त्या बाबत अद्यापही महापालिका प्रशासनाकडून निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही.

The election of Thane transport committee is postponed | ठाणे परिवहन समितीची निवडणूक लांबणीवर

ठाणे परिवहन समितीची निवडणूक लांबणीवर

Next

ठाणे : वर्षभर रखडलेल्या ठाणे परिवहन समितीच्या सदस्यांच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंजूर होऊनही त्या बाबत अद्यापही महापालिका प्रशासनाकडून निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. विशेष म्हणजे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर १० दिवसांत ही निवडणूक घेणे गरजेचे होते, असे असतांनाही प्रशासनाने अद्याप या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही.
ठाणे परिवहन समितीमधून सहा सदस्य निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी १४ मार्च २०१२ रोजी सात सदस्यांनी अर्ज भरले होते. यामध्ये काँग्रेसचा एक, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे तीन आणि रिपाइंच्या एकाचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेतील रखडलेल्या स्वीकृत सदस्य, विशेष समिती आदी सदस्यांच्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. परंतु परिवहन समितीवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि सदस्यपदासाठी अर्ज करुन बसलेल्या विविध पक्षातील पदाधिकारी मात्र आपली निवड कधी होणार याची वाट पाहत होते. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव मे महिन्यात मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. त्याला मंजुरी मिळून परिवहनमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांची निवड होणार असल्याचे निश्चित झाले. या प्रस्तावानुसार पुढील १० दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे गरजेचे होते. परंतु त्याला आता सुमारे महिनाभराचा कालावधी उलटला आहे. तरी देखील तो जाहीर झालेला नाही.

सहा सदस्यांवरच कारभार
ठाणे परिवहन समितीवर एकूण १२ सदस्य निवडले जातात. तर स्थायी समिती सभापती पदसिद्ध सदस्य असतो. तीन वर्षापूर्वी १२ पैकी सहा सदस्य निवृत्त झाले आहेत. यामुळे सहा सदस्यांवरच या समितीचा कारभार सुरु होता. याच सदस्यांमधून दोन वर्षापूर्वी सभापतीपदाची निवडणूक घेतली होती.
मात्र, वर्षभरापूर्वी या सदस्यांचीही मुदत संपली आहे. मात्र तेव्हापासून परिवहनचा कारभार हा विशेष समितीच्या माध्यमातून सुरु आहे.
आधीच डबघाईला आलेल्या ठाणे परिवहन समितीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी निवडणूक लवकर घेऊन त्या माध्यमातून कारभार सुरु करणे गरजेचे असतानाही अद्याप काहीच निर्णय न झाल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.

Web Title: The election of Thane transport committee is postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.