परिवहन सभापतीपदाची निवडणूक अखेर रद्द; कल्याण-डोंबिवली महापालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:27 AM2020-07-25T00:27:23+5:302020-07-25T00:27:29+5:30
कोकण विभागीय आयुक्तांचे पत्र
कल्याण : कोरोनामुळे रखडलेली केडीएमसीच्या परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक आॅनलाइन प्रक्रियेद्वारे होणार होती. परंतु, कोकण विभागीय आयुक्त लौकेश चंद्र यांचे शुक्रवारी नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, त्यात सभापतीपदाची निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. नव्या सभापतींची निवड जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत विद्यमान सभापती मनोज चौधरी कायम राहतील, असेही आदेशात म्हटले आहे.
सभापती निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर, निवडीची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार होती. त्यामुळे आॅनलाइन पद्धतीने होणारी ही निवडणूक राज्यातील पहिलीच निवडणूक ठरणार होती. महापालिका सचिव संजय जाधव यांनी आॅनलाइन निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. त्यासंदर्भात बुधवारी चाचणीही पार पडली होती.
मात्र, आॅनलाइन प्रक्रियेला सभापती चौधरी यांनी हरकत घेतली होती. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीप्रमाणेच लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्या, असे पत्र त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पाठवले होते. तत्पूर्वी समितीमधील शिवसेनेचे सदस्य मधुकर यशवंतराव यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने शिवसेनेची एक जागा रिक्त आहे. ते रिक्त पद आधी भरा, मगच सभापतीपदाची निवडणूक घ्या, अशीही मागणी चौधरी यांनी केली होती.
दरम्यान, शुक्रवारी कोकण विभागीय आयुक्तांनी नव्याने दिलेल्या आदेशात निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या स्थायी समिती, विषय समिती तसेच सदस्य निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याबाबत निर्देश आहेत, त्याप्रमाणे पुढील आदेशापर्यंत परिवहन समिती सभापती निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
परिवहन समितीमधील संख्याबळाच्या आधारे सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे पारडे जड होते. समितीमधील भाजपचे अभ्यासू सदस्य संजय राणे, संजय मोरे आणि प्रसाद माळी हे सभापतीपदाचे दावेदार मानले जात होते. परंतु, निवडणूक रद्द झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.