प्रगती महाविद्यालयात रंगली निवडणूकीची कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 08:03 PM2019-08-07T20:03:15+5:302019-08-07T20:03:42+5:30
डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयामध्ये निवडणूकीची कार्यशाळा भरवण्यात आली होती.
डोंबिवली - येथील प्रगती महाविद्यालयामध्ये निवडणूकीची कार्यशाळा भरवण्यात आली होती. कल्याण डोंबिवली महापालिका, तहसीलदार आणि कॉलेज प्रशासन यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा बुधवारी संपन्न झाली. त्या उपक्रमाला शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या ज्योती पोहणे यांनी सांगितले की मतदानाचा टक्का वाढावा, त्यामध्ये युवकांचा समावेश वाढावा यासाठी जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नायब तहसीलदार गंगाराम भोईर, महापालिकेचे ग प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शहरातील हमरस्त्यांवरुन जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यातून मतदान करणे, मतदानाचा टक्का वाढवण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांमध्ये जावे, त्या आधी मतदार नाव नोंदणी करण्यासाठीही आवश्यक ती कागदपत्रे जोडून तपशील द्यावा, मतदान हा आपला लोकशाहीचा अधिकार असून तो सगळयांनी अवर्जून बजवावा असे आवाहन त्यामधून विद्यार्थ्यांनी केले.
त्यानंतर ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण आहे अशा विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी फॉर्म भरण्याचे आवाहन जगताप यांनी केले. त्यानूसार तो कसा भरावा याचे प्रात्यक्षिक धडे देखिल युवकांनी घेतले. काहींनी तातडीने फॉर्म भरले, त्याचे संकलन करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले. महाविद्यालयातील अन्य प्राध्यापकांनीही उपक्रमात सहभाग घेत विद्यार्थ्यांची रॅली यशस्वी केल्याचे सांगण्यात आले.