निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, कोकण पदवीधर मतदारसंघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 03:05 AM2017-12-17T03:05:22+5:302017-12-17T03:05:31+5:30
कोकण पदवीधर मतदारसंघाचे पडघम आता जोरदार वाजू लागले असून राष्टÑवादी आणि भाजपामधून इच्छुकांत उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरूझाली आहे.
- अजित मांडके
ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाचे पडघम आता जोरदार वाजू लागले असून राष्टÑवादी आणि भाजपामधून इच्छुकांत उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरूझाली आहे. परंतु, भाजपा आणि शिवसेनेने काडीमोड घेतल्याने कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हे दोन पक्ष वेगळी चूल मांडणार असल्याचे चित्र जवळजवळ निश्चित मानले जात आहे. त्यानुसार, आता मतदार गोळा करण्यासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपामधून अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे.
मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी भाजपाच्या संजय केळकर यांचा पराभव केला होता. परंतु, आता संजय केळकर हे सध्या ठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार असल्याने त्यांनी यातून माघार घेतली आहे. परंतु, त्यांच्या पक्षातून अनेकांनी आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यामध्ये शहराध्यक्ष संदीप लेले यांनी यासाठी जोरदार तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. तसेच मिलिंद पाटणकर, डॉ. राजेश मढवी, विनय नातू आदींचीदेखील नावे चर्चेत आहेत. परंतु, कपिल पाटील यांच्या मुलाचे नाव मात्र जोरात चर्चेत आहे. तसेच निलेश चव्हाण हे आता भाजपात असल्याने त्यांनीदेखील यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
दुसरीकडे शिवसेना प्रथमच ही निवडणूक लढणार असल्याने त्यांनी मतदारांच्या नोंदणीस सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून शिवसेनेचे माजी महापौर संजय मोरे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तसेच वरुण देसाई आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. कदाचित, कोकणातील आणखी एखादा चेहरा देण्याची तयारीदेखील शिवसेनेकडून सुरू आहे.
जुलै महिन्यात निवडणुकीची चिन्हे
येत्या जुलै महिन्यात कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. यात शहरी भागातील मतदारांची संख्या वाढते आहे.
यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मतदार आपले मतदान करणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदारनोंदणीत सुमारे ४८ हजार मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती आहे. दुसºया टप्प्यात मतदारांची नोंदणी २१ डिसेंबरला पूर्ण होईल.