मुंबई, ठाण्यात टांग्यांच्या जागी विद्युत घोडागाडी; इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणाच्या सवलती लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:37 AM2019-08-22T00:37:27+5:302019-08-22T00:37:38+5:30
मुंबईसह राज्यातील सर्वच शहरांत पर्यावरणपूरक अशी विद्युत घोडागाडी सुरू करण्यास गृहविभागाने मंगळवारी मान्यता दिली आहे.
- नारायण जाधव
ठाणे : प्राणिमित्रांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे मुंबई, ठाण्यासह राज्यात शासनाने बंदी घातलेल्या घोड्यांच्या टांग्याची जागा विद्युत घोडागाडी घेणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्वच शहरांत पर्यावरणपूरक अशी विद्युत घोडागाडी सुरू करण्यास गृहविभागाने मंगळवारी मान्यता दिली आहे. यामुळे मरिन ड्राइव्ह, गिरगाव, जुहू चौपाटीसह ठाण्याच्या तलावपाळीवर विद्युत घोडागाड्या धावताना दिसतील.
ज्या भागात यापूर्वी टांगे सुरू होते, ते जितक्या प्रमाणात सुरू होते, त्याच प्रमाणात आणि त्याच मार्गांवर या विद्युत घोडागाड्या धावतील, असे गृहविभागाने स्पष्ट केले आहे. ‘यूबीओ रिड्झ’ या संस्थेच्या अहवालानंतर प्रायोगिक तत्त्वावर घोडागाड्यांना मान्यता दिली आहे. गृहविभागाने मान्यता दिलेल्या विद्युत घोडागाड्यांमध्ये चालकांव्यतिरिक्त सहा प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी आहे. या विद्युत घोडागाड्यांची आरटीओकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. याच्या चालकांना मोटार वाहन कायद्यान्वये परवाना घेणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व्हीटीएस प्रणाली बसवणे आवश्यक असून मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विद्युत घोडागाडी परवाना आणि बॅज घेणे क्रमप्राप्त केले आहे. त्यांच्या चालण्याच्या वेळांचे आणि मार्गांचे परिचालन हे वाहतूक पोलिसांनी सुनिश्चित केल्यानुसारच करावे, असे बंधन या विद्युत घोडागाडीच्या चालकांना घालण्यात आले आहे. राज्याच्या उद्योग विभागाने २०१८ च्या इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणातील १४ फेबु्रवारी २०१८ रोजी जाहीर केलेल्या सर्व सवलती लागू असणार आहेत.
माहिती एमएमआरडीएला
पहिल्या सहा महिन्यांपर्यंत प्रत्येक फेरीसाठीचे भाडे परवानाधारकास त्याने निश्चित केलेल्या दराप्रमाणे घेता येईल. तथापि, याची माहिती त्याने मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाला देणे आवश्यक आहे. यानंतर, वाहन चालनाच्या खर्चाचा अंदाज घेऊन आरटीओने प्रत्येक फेरीचे भाडे निश्चित करायाचे आहे.