उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात अंधाराचे साम्राज्य, मोबाईल टॉर्चवर रुग्ण सेवा, इन्व्हर्टरला दोष
By सदानंद नाईक | Published: July 13, 2023 05:22 PM2023-07-13T17:22:24+5:302023-07-13T17:28:32+5:30
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ व ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात.
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयाला विजेच्या लपंडावाचा फटका बसून रुग्णांवर मोबाईल टॉर्चवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली. विजेचा लपंडाव व इन्व्हर्टर मधील बिघाडामुळे रुग्णालयात अंधार झाल्याची कबुली रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ व ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज ९५० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असून वर्षाला ६ हजार पेक्षा जास्त मुले जन्म घेतात. अशा रुग्णालयातील रुग्ण सेवेवर विजेच्या लपंडावाचा परिणाम झाला आहे. रुग्णालयातील इन्व्हर्टर वारंवार नादुरुस्त होत असल्याने, डॉक्टरांवर अंधारात सेवा देण्याची वेळ आली. रुग्णालय प्रशासन रुग्णांना सेवा देण्यास कमी पडत असल्याची टीका होत असून अनेक वर्षं ठाण मांडून बसलेल्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. सन-१९८३ साली मंजूर पदेच रुग्णालयात कार्यान्वित असून रुग्णांची संख्या पाहता डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
मध्यवर्ती रुग्णालयात अंधाराचे साम्राज्य पसरून, कॅनडल लाईट डिलिव्हरी करण्याची वेळ डॉक्टरांवर येत आहे. गेल्या महिन्यात विजेचा लपंडाव व इन्व्हर्टर मधील बिघाडाने रुग्णालयातील सर्व शस्त्रक्रिया बंद ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली होती. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभार रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. दरम्यान राज्य व केंद्र शासनाकडून येणारा निधी रुग्णालयातून खर्च होतो का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. गेल्या एका वर्षांपासून नूतनीकरणांचा नावाखाली वातानुकूलित शवागृह बंद आहे. रुग्णालय अंतर्गत रस्ते बांधणीसाठी आलेला निधी गेला कुठे?, विविध शस्त्रक्रिया विभागाचे काम व रुग्णालयाचे नूतनीकरण व रंगरंगोटी झाली का? आदी असंख्य प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
रुग्णालयातील विकास कामे ठप्प?
रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाची बांधणी, वातानुकूलित शवागृह बांधणी, रुग्णालय अंतर्गत रस्ते बांधणी, रुग्णालयाची रंगरंगोटी, रुग्णालयाची दुरुस्ती, विविध मशीन यंत्रे आदी कामासाठी आमदार, खासदार निधीसह शासनाचा निधी आला आहे. मात्र कामा विनाच निधी खर्च झाल्याची चर्चा शहरात आहे. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन देतो असे सांगितले आहे.