उल्हासनगरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित
By admin | Published: July 18, 2015 11:54 PM2015-07-18T23:54:00+5:302015-07-18T23:54:00+5:30
हरित लवादाच्या आदेशानुसार वालधुनी नदी प्रदूषणाचा ठपका ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेवरून महावितरणने शहरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा,
- सदानंद नाईक, उल्हासनगर
हरित लवादाच्या आदेशानुसार वालधुनी नदी प्रदूषणाचा ठपका ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेवरून महावितरणने शहरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा, तर महापालिकेने ३५ कारखान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईने कारखाने बंद पडून हजारो कामगार बेकार झाले असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे.
उल्हासनगरात देशातील सर्वात मोठा जीन्स उद्योग भरभराटीस आला असून कारखानदारांनी मिळेल त्या जागी कारखाने उभारल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेकडो कारखाने कारखान्यांतील अॅसिडयुक्त रंगहीन सांडपाणी उघड्या नाल्यात सोडत आहेत. परिणामी, नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत असून सर्वाधिक क्षयरोगी कॅम्प नं-५ मधील जीन्स कारखाने परिसरात आहेत. तीनपैकी एक नागरिक खाज, त्वचारोग, उलटी, त्यासंबंधी रोगाला बळी पडला आहे.
कारखानदारांनी सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्लांट उभारण्याचे आदेश राज्य प्रदूषण मंडळाने काढले आहेत. जे कारखाने तो उभारणार नाहीत, त्यांना येथून गाशा गुंडाळण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. हे कारखाने प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडत असल्याने उल्हास नदीसह वालधुनी नदी प्रदूषित झाली असून त्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने कल्याण, उल्हासनगर यांच्यासह अंबरनाथ पालिकेला कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे.
न्यायालयाने एका जनहित याचिकेवर उल्हास व वालधुनी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषण मंडळाने पालिका व महावितरणला प्रदूषित जीन्स कारखान्यांची वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महावितरणचे कार्यकारी अभियंता मनोज त्र्यंबके यांनी सांडपाणी उघड्या नाल्यात सोडणाऱ्या कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, दोन महिन्यांत ११० कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. महापालिकेनेही ३५ कारखान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. इतर कारखान्यांनी अवैधपणे विहिरी खोदून त्या पाण्याचा वापर सुरू केला आहे. कॅम्प नं-४ व ५ परिसरातील हजारो कामगार बेकार झाले आहेत. प्रदूषण मंडळाचे नाहरकत आणल्यावरच वीजपुरवठा पूर्ववत करणार असल्याची माहिती त्र्यंबके यांनी दिली.