मुंब्रात एकाच इमारतीत पकडल्या ४३ घरात वीजचोरी; ८ जणांविरोधात गुन्हे नोंदवले
By अनिकेत घमंडी | Published: September 6, 2023 06:24 PM2023-09-06T18:24:27+5:302023-09-06T18:24:33+5:30
सदर ठिकाणी पूर्वी ‘नयना सदन’ नावाने इमारत होती. त्यावेळी २० वीज मीटर त्या इमारतीत होते
डोंबिवली: टोरंट पॉवरच्या दक्षता पथकाने घातलेल्या धाडीत मुंब्रा अमृत नगर येथील एका इमारतीत वीज चोरीच्या ४३ केसेस पकडल्या असून या प्रकरणी ८ जणांविरूध्द मुंब्रा पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. अमृत नगर येथील ‘बाग ए ख्वाजा’ या इमारतीत ही वीज चोरी पकडण्यात आली असून तळमजला ते सहा मजल्यांची ही इमारत आहे. येथील ४३ घरांमध्ये ८ जणांच्या नावाने वीज मीटर दाखवण्यात आले होते.
सदर ठिकाणी पूर्वी ‘नयना सदन’ नावाने इमारत होती. त्यावेळी २० वीज मीटर त्या इमारतीत होते. सदर बिल्डींग नंतर तोडण्यात आली मात्र मीटर वीज कंपनीकडे जमा करण्यात आले नव्हते. विकासक सय्यद शाबी अहमदवली यानी नवीन इमारत बांधताना नयना सदन हे आधीचे इमारतीचे नाव बदलून ‘बाग ए ख्वाजा’ असे नाव करून नवीन वीज मीटरसाठी अर्ज केलेला दाखवण्यात आला. प्रत्यक्षात त्या ठिकाणी आधीचे जुने मीटर लावून टोरंट पॉवरच्या वाहिनीतून थेट जोडणी करून वीज चोरी सुरू होती. तेथे ८ जणांच्या नावावर मीटर दाखवून चोरीची वीज ४३ घऱांमध्ये पुरवली गेली असल्याचे दक्षता पथकाच्या धाडीत निष्पन्न झाले.
या प्रकरणी विद्युत अधिनियम कायदा २००३ च्या अन्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकूण १५ लाख ९३ हजाराची वीज चोरी झाली असल्याचे धाडीत उघड झाले. ग्राहकानी चोरून वीज वापरू नये तसेच वीज मीटरमध्ये कोणताही फेरफार करू नये अन्यथा त्यांच्यावर वीज कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा टोरंट पॉवर कंपनीने दिला आहे.