हल्लेखोर दूधकर कुटुंबाकडून १७ लाख ६८ हजारांची वीजचोरी, अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By अनिकेत घमंडी | Published: January 16, 2023 03:58 PM2023-01-16T15:58:12+5:302023-01-16T15:59:03+5:30
वीजचोरी केल्याप्रकरणी तिघा दूधकर बंधूंविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात वीज कायदा २००३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची महिती महावितरणने सोमवारी दिली.
डोंबिवली - कल्याण पूर्व विभागातील काकडवाल गावात वीजचोरी शोध मोहिम पथकाला मारहाण करणाऱ्या दूधकर कुटुंबाने तब्बल १७ लाख ६८ हजार ७८० रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. दूधकर कुटुंबाने ११ जानेवारीला वीज चोरी शोध मोहिमेतील कार्यकारी अभियंत्यासह दहा अभियंते व कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. वीजचोरी केल्याप्रकरणी तिघा दूधकर बंधूंविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात वीज कायदा २००३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची महिती महावितरणने सोमवारी दिली. अनंता शनिवार दूधकर, अशोक शनिवार दूधकर आणि प्रकाश शनिवार दूधकर अशी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनीही मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करत मीटर टाळून वीजचोरी केल्याचे आढळले.
अनंता दूधकर याने ६ लाख ६९ हजार ५५० रुपयांची २८ हजार २५२ युनिट, प्रकाश दूधकर याने ७ लाख २३ हजार ३९० रुपयांची ३० हजार ८६९ युनिट तर अशोक दूधकर याने ३ लाख ५७ हजार ८४० रुपये किमंतीची १३ हजार २११ युनिट वीज चोरून वापरल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक अभियंता रविंद्र नाहिदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक श्रीरंग गोसावी करत आहेत. महावितरणच्या पथकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघा दूधकर बंधूंसह पाच जणांविरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात ११ जानेवारीला भारतीय दंड संहितेच्या १० व मुंबई पोलीस अधिनियम अशा विविध १३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाणप्रकरणी हिललाईन पोलिसांनी अनंता दूधकर या एकाच आरोपीला अटक केली आहे. महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटी तसेच वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद आहे. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात सहकार्य करावे तसेच कोणतीही युक्ती वापरून वीजचोरी करू नये, असे आवाहन महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.