वीज कामगार संघटनांचा फ्रेंचाइजीला विरोध, सोमवारी निदर्शने आणि द्वारसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 05:38 AM2020-03-02T05:38:56+5:302020-03-02T05:38:59+5:30
ठाणे येथील मुंब्रा, शीळ व कळवा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर उपविभाग क्रमांक एक, दोन, तीन आणि मालेगाव ग्रामीण उपविभागासाठी फ्रेंचाइजींची नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई : ठाणे येथील मुंब्रा, शीळ व कळवा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर उपविभाग क्रमांक एक, दोन, तीन आणि मालेगाव ग्रामीण उपविभागासाठी फ्रेंचाइजींची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, यास वीज कंपन्यांत कार्यरत सर्व सघंटनानी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून देण्यात आली.
फेडरेशन व सहकारी पाच संघटनांनी ७ जानेवारी, २०१९ रोजी संप केल्यानंतर मुंब्रा व मालेगाव विभाग खासगी भांडवलदारांना देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने तूर्त स्थगित केला होता. मात्र, सध्याच्या सरकारने हा निर्णय कोणाच्या हितासाठी घेतला आहे, असा सवालही संघटनांनी केला आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, गुजरातमध्ये व जळगाव, औरंगाबाद आणि नागपूर वितरणात असलेल्या खासगी फ्रेंचाइजी अपयशी ठरल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुंब्रा, शीळ व कळवा या विभागांसाठी टॉरेंट पॉवर, मालेगाव शहरातील उपविभाग क्रमांक एक, दोन व तीन आणि मालेगाव ग्रामीण उपविभागात येणारे भायेगाव, सायनी, दरेगाव, मालदे आणि द्याने या गावांसाठी कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांची फ्रेंचाइजी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
>ठाण्यातही विरोध
ठाणे येथील मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने व दुपारी एक द्वारसभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून देण्यात आली.