डोंबिवलीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या गोदामात अग्नितांडव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 08:40 AM2018-03-06T08:40:18+5:302018-03-06T08:43:46+5:30
सारस्वत कॉलनी पंचायत बावडीजवळील राणा टॉवर येथे जे.के. एन्टरप्रायझेसमधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.
डोंबिवली - सारस्वत कॉलनी पंचायत बावडीजवळील राणा टॉवर येथे जे.के. एन्टरप्रायझेसमधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. हे गोदाम 15 वर्षे जुने आहे. मंगळवारी (6 मार्च) सकाळी 6.30 वाजता आग लागल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. यानंतर तातडीनं याबाबतची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली. गोदामातून प्रचंड धुराचे लोट येऊ लागल्यानं खबरदारी म्हणून नागरिकांनी आधी इमारत रिकामी करत परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यासाठी धावपळ केली.
मनसेचे माजी नगरसेवक हर्षद पाटील यांचे पक्षाचे कार्यालय त्याच इमारतीमध्ये असून त्यांनी ही माहिती दिली. सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती हाताळली. बराच वेळ धूर येत असल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी आधी बाहेरील बाजूने जेथून धूर बाहेर येत होता तेथे पाणी मारले. पण तरीही आग आटोक्यात येत नव्हती. त्या गोडाऊनमध्ये फ्रिज, टीव्ही संच यासह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना कठीण गेले. गोडाऊनमध्ये सामान भरपूर प्रमाणात भरुन ठेवल्याने नेमकी कुठेपर्यंत आग पसरली आहे हे सांगणे कठीण असल्याचे सांगण्यात आले. पण धूर आणि आगीचे प्रमाण बघता नुकसान प्रचंड झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
गोदामाचे मालक प्रकाश जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार गोदामामध्ये सुमारे सव्वा कोटी रुपयांचा माल असून त्यात एसी, फ्रिज, टी.व्ही., एलईडी टीव्ही संच, वॉशिंग मशिन आदी महागड्या विद्युत उपकरणांचा समावेश होता. नेमकी आग कशामुळे लागली हे माहीत नसून नुकसान मात्र प्रचंड झाले असण्याची शक्यता असल्याचे जैन म्हणाले. अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी वेळ लागणार असून बेसमेंट असल्याने अनेक अडथळे येत आहेत. त्यातच चार चाकी गाड्यांचे पार्किंग झाले असल्याने अग्निशमन दलाला मदतकार्य करताना अडथळे येत आहेत. त्या गाड्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, त्यानंतरच पुढील माहिती मिळू शकेल असेही ते म्हणाले.