पंचांगांची गणिते कधीच चुकली नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:09 AM2018-03-28T00:09:56+5:302018-03-28T00:09:56+5:30
खगोलशास्त्रात गणित होतं. प्राचीन काळात गणितापासून पंचाग तयार केले जात असे. त्या पंचागांची गणिते कधीही चुकली नाहीत. त्यामुळे पूर्वापारपासून आपण भारतीय गणितात कुठेही कमी नाहीत
ठाणे : खगोलशास्त्रात गणित होतं. प्राचीन काळात गणितापासून पंचाग तयार केले जात असे. त्या पंचागांची गणिते कधीही चुकली नाहीत. त्यामुळे पूर्वापारपासून आपण भारतीय गणितात कुठेही कमी नाहीत, उलट अग्रेसर आहोत, असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा.कृ.सोमण यांनी व्यक्त केले.
ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ४ थी जिल्हास्तरीय गणित अध्यापक कार्यशाळा आयोजिली आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सोमण होते.
गणित हा विषय शिकविणाऱ्यांनी वर्गात जाताना चेहरा हसरा ठेवावा, विद्यार्थ्यांशी नीट बोलावे आणि विद्यार्थ्यांचे बोलणे नीट ऐकावे. गणित, विज्ञान या विषयातील नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून घेतले पाहिजे, असा सल्ला सोमण यांनी दिला. ठाण्यात गणित शिक्षकांसाठी होणारी ही कार्यशाळा विशेष उल्लेखनीय बाब असून, येत्या काळात ठाण्याची गणित केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री शिंदे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात मुलांमध्ये गुणांची स्पर्धा वाढली असतानाच, कठीण मानल्या जाणाºया गणिताबद्दल मुलांमध्ये गोडी निर्माण करण्याची नितांत गरज आहे. कोणत्याही विषयातून गणिताला वगळता येणार नाही, त्यामुळे हसतखेळत गणित शिकणे-शिकवणे महत्त्वाचे आहे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचे स्वागताध्यक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी मनोगत व्यक्त करताना गणितामध्ये एक अधिक एक म्हणजे दोन असे उत्तर येते. मात्र, राजकीय पातळीवर आम्ही एक अधिक एक म्हणजे ११ असे गणित मांडतो. राजकीय गणिते नेहमीच वेगळी असतात. त्यातून प्रामुख्याने माणसे जोडण्याचाच प्रयत्न केला जातो, असे ते म्हणाले.
यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, शिक्षणाधिकारी मीना यादव, गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष बी. एन. पाटील उपस्थित होते.
कार्यशाळेला ठाण्याच्या शहरी भागाबरोबरच पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.