बेरोजगारी, कोसळलेल्या अर्थव्यवस्थेविरुद्ध एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:31 AM2019-11-08T00:31:33+5:302019-11-08T00:31:44+5:30
सचिन सावंत यांची माहिती : १५ नोव्हेंबरपर्यंत काँग्रेसचे देशभर आंदोलन
ठाणे : देशातील ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचार अशा सर्वच स्तरांवर केंद्र सरकारची निष्क्रियता स्पष्ट झाली आहे. अच्छे दिनचे गाजर दाखवून जनतेची केलेली फसवणूक आदींबाबत केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध निषेध व्यक्त करून जनजागृती करण्यासाठी ठाण्यासह राज्यभर काँग्रेसच्या वतीने प्रतीकात्मक निषेध धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी दिली. यावेळी ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, रवींद्र आंग्रे, संजय घाडीगावकर, अॅड. प्रभाकर थोरात आणि सचिन शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
वागळेतील लघुउद्योगांना फटका
च्देशाचा विकासदर गेल्या सहा वर्षांत अवघा पाच टक्के राहिला. उद्योगातील खासगी आणि सरकारी गुंतवणूक थांबविण्यात आली आहे. गेल्या ४५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच बेरोजगारीचा दर सर्वाधिक प्रमाणात वाढला आहे.
च्सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी एक टक्काही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आहे त्या नोकऱ्यांमध्येही कपात झाली. बीएसएनएल, एमटीएनएलसारख्या सार्वजनिक उपक्रमातही स्वेच्छानिवृत्ती योजना राबविली जात आहे. राज्यातील आणि ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील लघू तसेच मध्यम उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही लाखो युवक बेरोजगार आहेत.
शहांच्या मुलांच्या संपत्तीत वाढ, शेतकरी आत्महत्याही वाढल्या
अमित शहांचा मुलगा जयेश शहा यांच्या संपत्तीमध्ये हजारो कोटींची वाढ झाल्याचा आरोप सावंत यांनी केला. दुसरीकडे बँकांचे एनपीए वाढले आहेत. भाजपचे टी-शर्ट घालून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकारची अनेक धोरणे ही जनतेच्या विरुद्ध असून या सर्वांचाच निषेध आंदोलनातून करण्यात येणार असल्याचे सावंत यावेळी म्हणाले.
ठाणे रेल्वे स्थानकाजवळ आज राबवणार स्वाक्षरी मोहीम
महाराष्टÑाचे केंद्रीय निरीक्षक मोहन प्रकाश, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, ठाण्याचे प्रभारी राजेश शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान देशभर आंदोलने केली जाणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी ठाणे रेल्वेस्थानकासमोरील सॅटिस ब्रिजखाली केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. तसेच वकील, डॉक्टर आणि गृहिणी यांची प्रतीकात्मक आंदोलने यावेळी केली जातील. त्यानंतर, नागरिकांच्या स्वाक्षºयांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे.