गोदामांवरील कारवाईविरोधात पुकारला एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 10:42 PM2019-08-06T22:42:24+5:302019-08-06T22:42:39+5:30

गोदामे नियमित करण्याची मागणी; उपोषणासह तीव्र आंदोलनाचा इशारा

Elgar calls out against warehouse operations | गोदामांवरील कारवाईविरोधात पुकारला एल्गार

गोदामांवरील कारवाईविरोधात पुकारला एल्गार

Next

भिवंडी : उद्योगनगरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या भिवंडीच्या ग्रामीण भागात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. गोदामांमुळे स्थानिक नागरिकांना रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात झाली असून, येथील अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतल्याने गोदाममालकांसह भूमिपुत्रांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. गोदामांना सील ठोकण्याची महसूल विभागाने सुरू केलेली कारवाई त्वरित थांबवावी आणि गोदामे पूर्ववत करून भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी पूर्णेश्वर टेम्पो असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भगत यांच्यासह पूर्णा ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी केली असून, यासंदर्भात पूर्णेश्वर टेम्पो असोसिएशन व पूर्णा ग्रामपंचायतीच्या वतीने भिवंडी प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना निवेदनही दिले आहे.

गोदामांवर होणारी कारवाई त्वरित थांबवण्यात यावी व भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी विनंती यावेळी ग्रामस्थांसह गोदाममालकांनी भिवंडी प्रांताधिकाऱ्यांना केली. महसूल विभागाने निवेदनाची दखल घेतली नाही, तर ९ आॅगस्टपासून गोदामे बेमुदत बंद ठेवण्याचा इशारादेखील यावेळी देण्यात आला. याप्रसंगी सुनील भगत यांच्यासह पूर्णा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत टावरे, विकास ईताडकर, सुरेश चौधरी, महादेव चौधरी, नरेश जाधव, श्याम इताडकर, दत्तू पाटील, रामचंद्र भगत, संजय पाटील, कैलास ईताडकर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भिवंडी तालुक्यातील राहनाळ, पूर्णा, काल्हेर, कोपर, मानकोली, गुंदवली, कशेळी, वळ, दापोडा, ओवळी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गोदामपट्टा विकसित झाला आहे. गोदामपट्टा विकसित झाल्याने या गावांसह येथील परिसराचा विकासदेखील झपाट्याने झाला आहे. या गोदामांच्या विस्तीर्ण जाळ्यामुळे या भागात देशविदेशांतील नामांकित कंपन्यांची गोदामे थाटण्यात आली आहेत. या गोदामांच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असून, ट्रान्सपोर्ट, हमाली, हॉटेल, खाणावळ, मिनरल वॉटर आदी व्यवसायांसह अनेक व्यापार व उद्योगधंदे निर्माण झाले आहेत. या छोट्यामोठ्या व्यवसायातून स्थानिक नागरिक आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. गोदामांच्या वाढत्या जाळ्यामुळे येथील जमिनींना भाव आला असून, जमीन खरेदीविक्रीचा व्यवसायदेखील वाढला आहे.

भिवंडी परिसरात अवैध गोदामांमुळे शासनाचा कोट्यवधी रु पयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे राज्य शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, या अवैध गोदामांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी ठाणे येथील रहिवासी राहुल जोगदंड यांनी मुंबई उच्च न्यायालयात या अवैध गोदामांसंदर्भात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठीत करून तातडीने अनधिकृत गोदामांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाºयांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर भिवंडी प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.

वारंवार आगीच्या घटना
तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी आदेशानुसार तालुक्यातील अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतली असून, गोदामे सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे, भिवंडीतील अनधिकृत गोदामांमध्ये अनधिकृत केमिकल साठ्यांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहे.

Web Title: Elgar calls out against warehouse operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.