उल्हासनगरात रविवारी कलावंतांची एल्गार परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:45 AM2021-08-14T04:45:49+5:302021-08-14T04:45:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मंजूर केल्याबद्दल गायिका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मंजूर केल्याबद्दल गायिका निशा भगत यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. मात्र ५६ हजार कलावंतांची गणना कधी आणि कशाच्या आधारावर केली, असा प्रश्न करून यादी प्रसिद्ध करण्याची मागणी करत, कलावंतांची रविवारी एल्गार परिषद आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्य शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली. दरम्यान, कलावंतांना देण्यात आलेल्या मानधनावरून सोशल मीडियावर श्रेयवाद रंगला असताना, शासनाने ५६ हजार कलावंतांची गणना कोणत्या आधारे केली, त्यात सर्व कलावंतांची नावे आहेत का? ज्यांनी यादी बनविली त्यांना कलावंतांची नावे माहीत आहेत का आदी प्रश्न उपस्थित करून कलावंतांच्या नावाची यादी राज्य शासनाने प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली. कलावंतांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी निशा भगत यांनी उल्हासनगर कॅम्प नं. - ४ येथे रविवारी कलावंतांच्या एल्गार परिषदेचे आयोजन केले. जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील कलावंत एल्गार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शासनाने या कलावंत यादीमध्ये तमाशा कलावंत, भारुड, गोंधळी, बॅण्डपथक, ऑर्केस्ट्रा कलाकार, चित्रपट मालिका नाट्य रंगभूमीवरील कलावंत, मेकअप, आर्टिस्ट सिने चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व तांत्रिक कर्मचारी, विविध हॉटेल्समध्ये कला सादर करणारे कलावंत अशा विविध क्षेत्रातून कला सादर करणाऱ्या कलावंतांचा समावेश यादीत करावा. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका पातळीवर शासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी निशा भगत यांनी केली. महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे पूर्ववत सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वेळेची मर्यादा हटवून परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली.
....
मानधन संपल्यावर उपाशी मरायचे काय?
राज्य शासनाने कोरोनाकाळात राज्यातील प्रत्येक कलावंतासाठी पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. हे मानधन संपल्यावर कलावंतांनी उपाशी मरायचे काय, असा प्रश्न निशा भगत यांनी शासनाला केला. कोरोना संपेपर्यंत व कलावंतांचे काम सुरू होईपर्यंत दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याची मागणी त्यांनी केली.