श्रमजीवींचा हक्कांसाठी एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:51 AM2020-02-26T00:51:58+5:302020-02-26T00:52:01+5:30
निवासी जागा, वनपट्ट्यांविषयी प्रशासनाला विचारला जाब
ठाणे : स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासींना अजूनही त्यांचे मूलभूत हक्क मिळालेले नाही. त्यांच्या या विविध समस्यांसह वनहक्क मिळवून देण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मागण्यांसाठी श्रमजीवींनी मंगळवारी निर्धार मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारला. मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूककोंडी झाली होती.
माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आदिवासींनी या निर्धार मोर्चात सहभाग घेतला होता. साकेत मैदानावर एकत्र आल्यानंतर या श्रमजिवींनी धडक मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयास धडक दिली. येथील शासकीय विश्रामगृहासमोरीलरस्त्यावर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चातील कार्यकर्ते येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंत पसरले होते. यामुळे वाहतूककोंडीलादेखील ठाणेकरांना तोंड द्यावे लागले.
वन हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह गावठाण विस्तार व गावठाण निर्मितीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेणे, शासकीय व खाजगी घराखाालील जागा नावे करणे, जातीच्या दाखल्यासाठी पन्नास वर्षांची जाचक अट रद्द करणे, प्रत्येक आदिवासी व गरीब कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ घेणे, आदिम म्हणजे कातकरी जमातीच्या कुटुंबीयाचे उत्थान करून वस्तीचा विकास करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.