उड्डाणपुलाच्या मार्गातील खारफुटीचा अडसर दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:32 AM2019-07-23T01:32:49+5:302019-07-23T01:33:05+5:30
माणकोली-मोठागाव पूल : ०.५८ हेक्टर कांदळवन जमीन होणार वळती
अनिकेत घमंडी
डोंबिवली : माणकोली ते मोठागाव रस्त्यावर उल्हास खाडीवरील पोहोच रस्त्यासह ९८० मीटर लांबीचा सहापदरी पूल बांधण्यासाठी ०.५८ हेक्टर कांदळवन जमिन वळती करण्यास अखेर वनविभगााने मंजुरी दिली आहे. त्यासाठी एमएमआरडीएने २८ जून २०१७ मध्ये त्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार जागेची पाहाणी करून अहवाल सादर झाल्यानंतर त्यास वनविभागाने सोमवारी मंजुरी दिल्याने या उड्डाणपुलाच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथे हा पूल भिवंडी येथून येणार आहे. मोठागावमध्ये त्याचे काम जोरात सुरू असून भिवंडी दिशेकडे जमीन हस्तांतरणाच्या अडचणींमुळे त्याचे काम माठागावच्या तुलनेत संथगतीने सुरूआहे. हा पूल झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे हे अंतर रस्ता वाहतुकीने २० मिनिटांत पार येणे शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या गतीने वाहने धावणार असून कल्याण, डोंबिवलीकरांचा प्रवास अधिक वेगाने होणार आहे. एमएमआरडीएचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो आघाडीच्या काळात बांधायला सुरुवात झाली होती. त्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये त्याच्या पायाभरणीचे भूमिपूजन केले होते. त्यावेळीही कल्याण-डोंबिवलीच्या शिवसैनिकांनी डोंबिवली मोठागाव येथील खाडी किनाऱ्यावर जाऊन एक दिवस आधीच पुलाच्या या दिशेकडून भूमिपूजन सोहळा केला होता. त्यामुळे पुलाच्या कामाच्या शुभारंभापासूनच अनेक अडथळे येत आहेत.
दरम्यान, एमएमआरडीएच्या विनंतीनुसार ०.५८ हेक्टर कांदळवनाची जमीन वळती करण्यासंदर्भात वनविभागाची परवानगी मिळाल्याने तसे आदेश उपवनसंरक्षक, ठाणे, वनविभागीय अधिकारी, तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहेत. त्यांनी यासंदर्भात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत, नगरपरिषद, आणि संबंधित शासकीय कार्यालयांचे प्रमुख आदींना द्यावेत, असेही सांगण्यात आले आहे.
रिंगरूटचे काम होणे आवश्यक
उड्डाणपूल झाल्यानंतर डोंबिवली शहरालगतचा रिंगरूट जर झाला नाही तर मात्र शहरातील वाहतूककोंडी वाढणार असून शहरातील वाहनचालकांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणकोली उड्डाणपुलासोबतच रिंगरुटही व्हावा आणि वाहतूक सुरळीत व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.