आंदोलन की चमकोगिरी : कळवा रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 मिनिटांसाठी रेल रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 08:14 AM2017-10-03T08:14:17+5:302017-10-03T10:07:36+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेला प्रशासन जबाबदार आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. हा रेल रोको पाहून राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं की चमकोगिरी?, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. कळवा रेल्वे स्थानकावरुन सीएसटीला जाणारी 9 वाजून 9 मिनिटांची लोकल 2 मिनिटांसाठी अडवण्यात आली. जसे जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसहीत रेल रोको करण्यासाठी रुळांवर उतरले तसं तातडीने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मागे हटवले व लोकलचा मार्ग मोकळा केला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेची पुनरावृत्ती भविष्यात घडू नये आणि बुलेट ट्रेनऐवजी लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्यक्रम द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता रेल्वे रोखून आंदोलन केलं. कळवा रेल्वे स्थानकात हे रेल रोको आंदोलन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.
शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला तर 39 जण जखमी झालेत. त्यानंतर आता एकूणच रेल्वेच्या पादचारी पुलांच्या समस्यांकडे सर्वाच्याच नजरा वळल्या आहेत. बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखविण्याऐवजी आणि ज्या ट्रेनचा मुंबईकरांना फायदाच नाही, अशी ट्रेन बंद करण्याची मागणी आव्हाडांनी केली आहे. याशिवाय सर्वसामान्यांच्या लोकलच्या संख्येत वाढ करावी, वेळेची नियमितता पाळावी, सध्या ठाणे स्थानकातून तब्बल साडे सहा लाख प्रवासी रेल्वे रोज प्रवास करत आहेत. परंतु येथील पादचारी पुलासह, इतर ठिकाणच्या रेल्वेच्या पादचारी पुलांची अवस्थाही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे या पुलांची संख्या वाढवावी, अरुंद पुल रुंद करावेत, सबर्बनसाठी 45 हजार कोटींचा निधी द्यावा, दिव्याला जंक्शनचा दर्जा द्यावा, कळव्यातून लोकल सुटाव्यात, पारसिक जंक्शन करावे, प्लॅटफॉर्म वाढवावेत आदींसह इतर मागण्यांसाठी हा रेल रोको करण्यात आला.