धोकादायक कामास जुंपलेल्या बाल मजुराची सुटका
By धीरज परब | Published: July 31, 2023 06:44 PM2023-07-31T18:44:04+5:302023-07-31T18:44:13+5:30
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षने भाईंदर मधून एका स्टील कारखान्यात धोकादायक कामास जुंपलेल्या बाल मजुराची सुटका करून मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मीरारोड - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षने भाईंदर मधून एका स्टील कारखान्यात धोकादायक कामास जुंपलेल्या बाल मजुराची सुटका करून मालकावर गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पूर्वेला फाटक मार्गावरील मिलन हॉल जवळील स्वस्तिक इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका स्टील कारखान्यात अल्पवयीन बालकास पत्रा कटिंग , इलेक्ट्रिक पावर प्रेस मशीनच्या धोकादायक कामावर जुंपल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील यांना मिळाली. त्यांनी विजय निलंगे, रामचंद्र पाटील, किशोर पाटील, केशव शिंदे, अश्विनी भिलारे, शीतल जाधव, सम्राट गावडे, चेतनसिंग राजपूत सह सदर कारखान्यावर छापा मारला.
त्यावेळी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुला कडून स्टील वाटी बनवणाऱ्या इलेक्ट्रिक प्रेस मशीन जवळ जिवाला धोकादायक असे काम तसेच अन्य श्रमाची कामे करवून घेतली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी बालकाची सुटका करत मालक तेजस मिस्त्री (२४ ) रा . सेक्टर ५, चारकोप, कांदिवली विरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात बाल व किशोरवयीन प्रतिबंध कायदा व बाल न्याय अधिनियम नुसार२९ जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे.