दयनीय अवस्थेची लाज वाटते, परिवहन समिती सदस्यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 01:18 AM2020-01-10T01:18:22+5:302020-01-10T01:18:30+5:30
परिवहन उपक्रमाचे उत्पन्न वाढावे, याकडे समितीच्या बैठकीत सदस्य वारंवार लक्ष वेधतात.
कल्याण : परिवहन उपक्रमाचे उत्पन्न वाढावे, याकडे समितीच्या बैठकीत सदस्य वारंवार लक्ष वेधतात. त्यावर प्रशासनाकडून सकारात्मक उत्तरे दिली जातात. पण कृती शून्य आहे. बस ब्रेकडाउन होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अन्य उपक्रमांच्या बस शहरात जोमाने सुरू आहेत. त्यामुळे केडीएमटीची ही दयनीय अवस्था पाहताना अक्षरश: आम्हाला लाज वाटते, अशा परखड शब्दांत भाजपचे सदस्य संजय मोरे आणि संजय राणे यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत गुरुवारी नाराजी व्यक्त केली.
परिवहन समितीच्या घटणाऱ्या उत्पन्नाबाबत बैठक बोलावण्याची मागणी मोरे यांच्यासह तीन सदस्यांनी केली होती. बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी उपक्रमाच्या घटलेल्या उत्पन्नाबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. परिवहनचे उत्पन्न प्रतिदिन सहा लाखांच्या आसपास होते. सद्य:स्थितीला ते साडेतीन लाखांपर्यंत कमी झाले आहे. सभेला सुरुवात होताच सदस्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर हल्लाबोल केला. बैठका घेऊन कोणताही फायदा नाही, बैठकीत प्रश्न उपस्थित केल्यावर अधिकाºयांकडून गोडगोड उत्तरे दिली जातात. मात्र, दालनाबाहेर पडल्यावर त्यांना आपल्याच उत्तरांचा विसर पडतो. अधिकाºयांची उत्पन्नवाढीकरिता काम करण्याची मानसिकताच नाही. रेल्वेच्या ब्लॉकदरम्यान उपक्रमाचे उत्पन्न वाढते, मग इतरवेळी ते का वाढत नाही, अशा शब्दांत मोरे यांच्यासह प्रसाद माळी आणि मधुकर यशवंतराव यांनी तोफ डागली. यावर एएमसी (वार्षिक देखभाल दुरुस्ती कंत्राट) बंद झाले आहे. चालक-वाहकवर्ग अपुरा आहे. पूरपरिस्थिती, वाहतूककोंडीसह रिक्षांची वाढलेली संख्या आणि अन्य सार्वजनिक वाहतुकीत वाढलेली स्पर्धा यामुळे प्रवासीसंख्येत घट होऊन उत्पन्न घटल्याची माहिती उपक्रमाचे अधिकारी संदीप भोसले यांनी दिली. भोसले यांनी केलेल्या खुलाशाला सदस्यांकडून हरकत घेण्यात आली. रिक्षावाल्यांना कशाला दोष देता, आपले बसथांबे आहेत का? त्याठिकाणी बस वेळेवर येतात का? जूनमध्ये बसनिवारे बसवा, अशी सूचना केली होती. त्याचे काय झाले? जीपीएस प्रणाली बसमध्ये बसविली जाणार होती. त्याच्या अंमलबजावणीचे काय झाले? अशी प्रश्नांची सरबत्ती मोरे यांच्याकडून करण्यात आली. रिक्षावाल्यांवर तुम्ही प्रवासीसंख्या घटल्याचे खापर फोडता, पण दुसरीकडे लोकसंख्याही वाढत आहे. मग, तुम्हाला प्रवासी का मिळत नाहीत, असा प्रश्न सदस्य राणे यांनी केला. एएमसी कंत्राटात जास्तीतजास्त बस चालविल्या जाणार होत्या, त्याचेही नियोजन उपक्रमाला
करता आले नाही, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. सदस्य प्रसाद माळी आणि दिनेश गोरे यांनीही उपक्रमाच्या कारभारावर चांगलेच तोंडसुख घेतले.
>लवकरच केडीएमटी पूर्वपदावर येईल : सर्वपक्षीय सदस्यांनी केलेल्या टीकेनंतर व्यवस्थापक खोडके म्हणाले की, कामचुकार अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई सुरूच असते. आतापर्यंत ४६ जणांना निलंबित केले असून नऊ जणांना सेवेतून बडतर्फ केले आहे. एएमसीकडून पूर्णपणे प्रतिसाद मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. लवकरच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १४० बसथांबे बसविले जाणार आहेत. ते स्टेनलेस स्टीलचे असणार आहेत, तर जीपीएसची निविदा प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
>पुष्पगुच्छ नको, वह्या द्या : स्थायी समितीचे सभापती हे परिवहनचे पदसिद्ध सदस्य असतात. स्थायीचे नवनिर्वाचित सभापती म्हात्रे यांनी गुरुवारच्या सभेला उपस्थिती लावली होती. त्यांची पहिलीच सभा असल्याने सर्वपक्षीय सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शुभेच्छांचा स्वीकार करताना यापुढे पुष्पगुच्छ नको, तर मला वह्यांची भेट द्या. त्या मी गरजू विद्यार्थ्यांना देईन, अशी भूमिका म्हात्रेंनी बोलून दाखविली.