आयारामांच्या प्राधान्याने सेनेतील निष्ठावंतांमध्ये पसरली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:34 AM2018-08-24T00:34:58+5:302018-08-24T00:36:15+5:30
मीरा-भार्इंदरमधील शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची यादी नुकतीच मातोश्रीवरून प्रसिद्ध झाली.
भार्इंदर: मीरा-भार्इंदरमधील शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची यादी नुकतीच मातोश्रीवरून प्रसिद्ध झाली. त्यात अनेक निष्ठावंतांना त्याच पदावर ठेऊन काहींच्या जबाबदाºयांना कात्री लावली आहे. काही निष्ठावंतांना पदेच न देता आयारामांना प्राधान्य दिल्याने नाराजी पसरली आहे.
शिवसेनेचे तत्कालिन शहरप्रमुख धनेश पाटील हे निष्ठावंत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जाहीर झालेल्या पद नियुक्तीच्या यादीतून अचानक नाव रद्द झाले. अशीच परिस्थिती अनेक निष्ठावंतांची झाली आहे.
काही निष्ठावंतांच्या जबाबदारीला तर कात्री लावत आयारामांना समान पदे दिली आहेत. यात समाजवादी पक्षाचे राष्टÑीय प्रवक्ते विक्रम प्रतापसिंह यांना सेनेने थेट उपजिल्हाप्रमुखपदी विराजमान केले आहे. अगोदरच एका पक्षात कार्यरत असताना त्यांना सेनेत जबाबदारीचे पद देणे, ही सेनेची परंपरा आहे का, असा प्रश्नही निष्ठावंतांकडून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे वरिष्ठ व दुरावलेल्या शिवसैनिकांचे सत्कार केले जातात तर दुसरीकडे त्यांचीच हकालपट्टी करण्याचा डाव आखला जाणे, हे चुकीचे आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय राहिल्याचा मोबदला अशा पद्धतीने मिळत असेल तर ते योग्य नाही.
- धनेश पाटील, निष्ठावंत
मी समाजवादी पक्षात असलो तरी कधीच सक्रीय राहिलो नाही. महाराष्टÑ कर्मभूमी असल्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उपजिल्हाप्रमुखपद मिळाले आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाचा राजीनामा देणार आहे. तत्पूर्वी वरिष्ठांना तसे कळवले आहे.
- विक्रम प्रतापसिंह, उपजिल्हाप्रमुख