गोठेघर ग्रामपंचायतीत अपहार; सरपंचासह चौघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:32+5:302021-08-25T04:45:32+5:30
शहापूर : गोठेघर ग्रामपंचायत अंतर्गत पाच लाख ७६ हजार रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच दोन ग्रामसेवक यांच्याविराेधात ...
शहापूर : गोठेघर ग्रामपंचायत अंतर्गत पाच लाख ७६ हजार रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच दोन ग्रामसेवक यांच्याविराेधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घरपट्टीची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर खर्च करणे, धनादेशाद्वारे रक्कम काढून त्याचा वैयक्तिक वापर करणे आणि देयके अदा केलेल्या कामांची दप्तरी नोंद न ठेवणे आदींच्या माध्यमातून हा अपहार झाला आहे.
गोठेघर ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार आणि कामातील अनियमिततेकडे माजी सरपंच गणेश कामडी यांनी शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. या अपहारप्रकरणी जबाबदार असलेले गोठेघर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शहापूर पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी रमेश महाले यांनी जुलै २०२१ मध्ये गोठेघर ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी केली होती. त्यात मार्च २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी के. बी. निकम, ग्रामसेवक शिवाजी बांगर व जगदीश मडके यांच्यासह महिला सरपंच रुचिता पिंपळे यांनी एकूण पाच लाख ७६ हजार रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. या अपहारप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अशाप्रकारे झाला अपहार
- तत्कालीन निकम व सरपंच पिंपळे यांनी ६ मार्च २०२० रोजी धनादेशाद्वारे १४ हजारांची रक्कम स्वतःसाठी काढून वापर केला आहे, तर बांगर व पिंपळे यांनी १ जून २०२० ते २३ डिसेंबर २०२० या कालावधीत धनादेशाद्वारे सात वेळा विविध रकमेची एकूण एक लाख ४१ हजार ८०० रुपये काढून स्वतःसाठी वापर केला आहे.
- ग्रामसेवक मडके व सरपंच पिंपळे यांनी ग्रामपंचायतीची घरपट्टीची रक्कम, विकास शुल्क व दाखल्याची फी अशी एकूण तीन लाख ४८ हजार ४१५ एवढी रक्कम ३१ मार्च २०२१ रोजी बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च केली.
- ग्रामसेवक बांगर व पिंपळे यांनी गोठेघर ग्रामपंचायत हद्दीतील कातकरीवाडी रस्ता दुरुस्ती करणे, गणेश घाट रस्ता दुरुस्ती करणे व बंगल्याची वाडी रस्ता दुरुस्ती करणे यासाठी एकूण ७२ हजारांची देयके अदा केली आहेत; मात्र कामांचे अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, मूल्यांक दाखले आदी दप्तर उपलब्ध नसल्याने त्यांनी अपहार केल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.