कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाला आलिंगन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 11:44 PM2020-06-12T23:44:15+5:302020-06-12T23:44:41+5:30
भिवंडीतील प्रकार : ५० ते ६० जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
भिवंडी : कोरोनाने मृत्यू झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी रुग्णालयातून ताब्यात घेतला. प्लास्टिकमध्ये बांधलेला मृतदेह अंत्यसंस्कारपूर्वी नातेवाईकांनी बाहेर काढून त्याला अलिंगन दिल्याचा धक्कादायक प्रकार येथील कामतघर परिसरात घडला आहे. ५० ते ६० जणांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढली. हा प्रकार पालिका प्रशासनाला एका नागरिकाने कळवताच परिसरात खळबळ उडाली. यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
भिवंडीत मागील १५ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कामतघर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने कळवा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांनतर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी घरी आणला. प्लास्टिकमध्ये बांधलेला मृतदेह बाहेर काढून १० ते १५ जणांनी अलिंगन देत दु:ख व्यक्त केले. त्यांनतर ६० जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ही माहिती परिसरातील माजी नगरसेवक कमलाकर पाटील यांना मिळताच त्यांनी पालिका आयुक्तांना घडलेल्या प्रकाराची माहिती देताच आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सहायक आयुक्त सुदाम जाधव यांना सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जाधव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाच्या संपर्कात आलेल्या ४५ जणांना तातडीने क्वारंटाइन केले.
परिसर केला सील
पालिकेने ४५ जणांना क्वारंटाइन केले असून, त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल तपासणीसाठी पाठविले आहेत. हा संपूर्ण परिसर सील केला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कारास उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.