जिल्ह्यात पुन्हा लसीकरणाची आणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:33+5:302021-04-23T04:42:33+5:30
ठाणे : मागील काही दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात ठाणे जिल्ह्याला लसींचा साठा मिळत आहे. बुधवारी जिल्ह्यासाठी अवघा १८ ...
ठाणे : मागील काही दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात ठाणे जिल्ह्याला लसींचा साठा मिळत आहे. बुधवारी जिल्ह्यासाठी अवघा १८ हजार १०० लसींचा तूटपुंजा साठा आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शिल्लक असलेल्या ५६ हजार लसींच्या माध्यमातून गुरुवारी जिल्ह्यात लसीकरण सुरु होते. या तुटवड्यामुळे ठाणे महापालिकेची केवळ ८ केंद्रेच सुरु असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानुसार तेथील साठ्यावरदेखील आता परिणाम झाला आहे. असे असले तरी जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत दिवसभरात १५०० जणांचे लसीकरण केल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु आलेला साठा अगदीच मोजका असल्याने जिल्ह्यात पुन्हा लसीकरणाची आणीबाणी निर्माण झाली आहे.
एकीकडे ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु दुसरीकडे लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होताना दिसत नाही. मागील आठवडाभर लस कमी अधिक प्रमाणात जिल्ह्याला उपलब्ध होत होत्या. परंतु आता संपूर्ण जिल्ह्यासाठी अवघा १८ हजार १०० लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. या साठ्यातून कोणाला किती लस द्यायची, असा पेच आरोग्य यंत्रणेपुढे निर्माण झाला होता. अखेर प्रत्येकाच्या वाट्याला १ हजार ते ३५०० लसींचा साठा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्डचा ३२ हजार ७८० आणि कोव्हॅक्सिनचा २३ हजार २२० एवढाच साठा शिल्लक असल्याचे दिसून आले. गुरूवारी याच साठ्यातून जिल्ह्याच्या विविध भागात लसीकरण करण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तर ५६पैकी केवळ ८ केंद्रांवर गुरुवारी लसीकरण सुरु होते. परंतु याची माहिती ठाणेकरांना नव्हती. ५६पैकी नेमकी कोणती आठ केंद्रे सुरु आहेत, याची माहिती नसल्याने नागरिक वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांवर जाऊन परत फिरत होते. त्यामुळे लसीकरणासाठी त्यांची दमछाक उडाल्याचेच चित्र दिसत होते. बुधवारी महापालिका हद्दीत दुसरा डोस देण्यात येत होता. परंतु त्यासाठी एकच केंद्र सुरु ठेवण्यात आले होते. गुरुवारी आठ केंद्रे सुरु असली तरी महापालिकादेखील आता लसींचा साठा पुरवून पुरवून वापरत आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लसींचा साठा वेळत उपलब्ध होत नसल्याने दिवसाला ८ ते १० हजार होणारे लसीकरण आजच्या घडीला १ ते १५०० च्या घरात आले आहे. महापालिकेच्या केंद्रांवर तर दिवसभरात अगदी कमी प्रमाणात लसीकरण झाले होते. ठाणे महापालिकेकडे १६०० लसींचा साठा शिल्लक असून, त्यात कोव्हीशिल्ड १४०० आणि कोव्हॅक्सिनचा २०० लसींचा समावेश आहे.
ठाणे शहरातील लसीकरण केंद्र बंद असल्याने ठाणेकरांनी गुरुवारी आपला मोर्चा थेट जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे वळवला. जिल्हा रुग्णालयाने आलेल्या प्रत्येक नागरिकाला दिवसभरात लस दिली. त्यानुसार दिवसभरात येथील केंद्रावर नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी होती. दिवसभरात जिल्हा शासकीय रुग्णालयात तब्बल १५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला साठादेखील अपुरा आणि तूटपुंजा असल्याने लसीकरण केंद्रे कशी चालवायची, असा पेच स्थानिक प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. मागणी करुनही लसींचा साठा हवा त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिल्लक साठा किती दिवस नाही तर किती तास पुरणार, हेच आता पाहिले जात आहे.
जिल्हानिहाय आलेला १८ हजार १०० लसींचा साठा
ठाणे - ३५००
कल्याण डोंबिवली - ३५००
मीराभाईंदर - ३०००
नवी मुंबई - ३०००
ठाणे ग्रामीण - ३१००
उल्हासनगर - १०००
भिवंडी - १०००
------------
एकूण - १८१००