सुरक्षारक्षकांच्या केबिनमध्ये स्थापला आपत्कालीन कक्ष
By Admin | Published: May 27, 2017 02:10 AM2017-05-27T02:10:16+5:302017-05-27T02:10:16+5:30
२७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ई प्रभागाचे कार्यालय दावडी परिसरातील रिजन्सी गार्डनमधील प्रशस्त अशा जागेत उभारण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : २७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ई प्रभागाचे कार्यालय दावडी परिसरातील रिजन्सी गार्डनमधील प्रशस्त अशा जागेत उभारण्यात आले आहे. परंतु, लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या कार्यालयात मात्र आपत्कालीन कक्षासाठी जागा नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अखेर, जागेअभावी हा कक्ष अत्यंत छोट्या अशा सुरक्षा विभागाच्या केबिनमध्ये थाटण्याची नामुश्की येथील प्रशासनावर ओढवली आहे. आधीच केबिन सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी गैरसोयीची ठरत असताना त्यात आता आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांची भर पडली आहे.
१२ फेब्रुवारीला ई प्रभाग कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. परंतु, ही जागा येथील ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीची असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. स्थानिक रहिवासी असलेल्या विश्वनाथ पटवर्धन यांनी या अतिक्रमणाची मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सोसायटीच्या वतीने महापौर राजेंद्र देवळेकर आणि तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. दरम्यान, लाखो रुपये खर्चून हायटेक स्वरूपात बांधण्यात आलेल्या या प्रभाग कार्यालयात आपत्कालीन कक्षासाठी एखादे दालन नसणे, ही शरमेची बाब ठरली आहे. पावसाळ्याच्या धर्तीवर महापालिकेच्या सर्वच प्रभाग कार्यालयांमध्ये आपत्कालीन कक्ष उभारण्यात आले आहेत. इतरत्र या कक्षांची स्थिती फारशी आलबेल आहे, असेही नाही. परंतु, प्रशस्त अशा ई प्रभाग कार्यालयात चार बाय पाच आकाराच्या सुरक्षा केबिनमध्ये थाटण्यात आलेला आपत्कालीन कक्ष हा चर्चेचा विषय ठरला आहे.
या केबिनमध्ये जेमतेम एखादा सुरक्षारक्षक बसेल, इतकीच जागा आहे. त्यात आता या कक्षाची भर पडल्याने आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांंबरोबरच सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही गैरसोय होणार आहे. आपत्कालीन सेवेसाठी तीन पाळ्यांत प्रत्येकी पाच कर्मचारी देण्यात आले आहेत.