आपत्कालीन कक्षातील कर्मचारीच आपत्तीत, कक्षात ड्रेनेजचे पाणी; आरोग्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:38 AM2020-07-07T01:38:14+5:302020-07-07T01:38:21+5:30
शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाने ड्रेनेज तुडुंब भरल्याने ही समस्या उद्भवल्याचे सांगितले जात असले, तरी सोमवारीही समस्या कायम होती.
डोंबिवली : दुर्घटना घडल्यास तातडीने मदतकार्य सुरू करता यावे, यासाठी पावसाळ्यात केडीएमसी दरवर्षी आपत्कालीन कक्षाची निर्मिती करते. मात्र, आपत्तीच्या वेळी धावून जाणारे कर्मचारीच सध्या आपत्तीत असल्याचे चित्र महापालिकेच्या येथील डोंबिवली विभागीय कार्यालयात पाहायला मिळत आहे. ड्रेनेजचे सांडपाणी कक्षात घुसल्याने तेथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाने ड्रेनेज तुडुंब भरल्याने ही समस्या उद्भवल्याचे सांगितले जात असले, तरी सोमवारीही समस्या कायम होती. ग्रंथालयाच्या जागेत आपत्कालीन कक्ष स्थलांतर करूनही त्रास कायम राहिल्याने ‘आगीतून फुफाट्यात’ अशी या कर्मचाऱ्यांची अवस्था झाली आहे. ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीनुसार प्रतिवर्षी आयुक्तांकडून सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात. एखादी दुर्घटना अथवा आपत्ती घडली तर त्याला सामोरे जाण्यासाठी सर्व प्रभागांतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्ष २४ तास चालू ठेवले जातात. साधारण १५ मे ते १५ आॅक्टोबर या कालावधीत हे कक्ष सुरू असतात.
प्रामुख्याने पावसाळ्यात सुरू राहणारे हे आपत्कालीन कक्षच सध्या आपत्तीत सापडले आहेत. प्रामुख्याने सफाई कामगारांवर आपत्ती निवारण करण्याची भिस्त असल्याचे डोंबिवलीतील ‘ग’ आणि ‘फ’ कार्यालयातील चित्र पाहता स्पष्ट होते. याठिकाणी दिले गेलेले कर्मचारी विविध आजारांनी आणि व्याधींनी त्रस्त असल्याने त्यांच्याकडून आपत्ती निवारण्याची काय अपेक्षा करणार, असाही सवाल उपस्थित होत आहे. नियुक्त केलेल्या कर्मचाºयांंपैकी मोजकेच कर्मचारी घटनास्थळी आढळून येतात. दोन्ही प्रभागांच्या आपत्कालीन कक्षासाठी याआधी डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात जागा देण्यात आली होती. ती जागा गैरसोयीची असल्याने हा कक्ष डोंबिवली विभागीय कार्यालयातील ग्रंथालयाच्या जुन्या जागेत स्थलांतरित करण्यात आला. मात्र, तिथेही त्रास कमी झालेला नाही.
कचरा अन् धुळीचे साम्राज्य!
ग्रंथालयाची जुनी जागा ही अडगळीच्या सामानाचे हक्काचे ठिकाण झाले आहे. त्यामुळे कर्मचाºयांना येथे घाण आणि कचरा, धुळीचे साम्राज्य असल्याने प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव तर आहेच; शिवाय कक्षात ड्रेनेजचे पाणी शिरल्याने बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात
आले आहे.