आपत्कालीन कक्षातील कर्मचारीच ‘आपत्तीत’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 01:05 AM2019-07-15T01:05:15+5:302019-07-15T01:05:22+5:30
पावसाळ्यात दरवर्षी केडीएमसी प्रशासनाच्या वतीने प्रभागांमध्ये आपत्कालीन कक्ष उघडले जातात.
पावसाळ्यात दरवर्षी केडीएमसी प्रशासनाच्या वतीने प्रभागांमध्ये आपत्कालीन कक्ष उघडले जातात. एखादी दुर्घटना घडल्यानंतर ती आपत्ती निवारण्यासाठी कक्षांची निर्मिती केली जात असली तरी अपुरे कर्मचारी आणि पुरेशा साधनांअभावी हे कक्षच आपत्तीत असल्याचे चित्र कल्याण डोंबिवलीतील प्रभाग कार्यालयांमधील आपत्कालीन यंत्रणा पाहता समोर येते. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन असो अथवा राजकीय नेत्यांकडून आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम करण्यासंदर्भात मोठया बाता मारल्या खऱ्या परंतु घटना घडल्यानंतर काही दिवसातच दिली गेलेली आश्वासने हवेत विरून जातात हेही तितकेच खरे. अपुरा कर्मचारी आणि कुशल साधनांची कमतरता यामध्ये सतर्क राहयचे तरी कसे? असा सवाल संबंधित कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात असताना दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेल्या कार्यालयात उघडलेले आपत्कालीन कक्ष पाहता एकप्रकारे त्यांच्या जिविताशीही प्रशासनाचा खेळ सुरू असल्याचे वास्तव पाहयला मिळते.
‘नेमिची येतो’ पावसाळा या उक्तीनुसार प्रतिवर्षी आयुक्तांकडून सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात. एखादी दुर्घटना अथवा आपत्ती घडली तर त्याला सामोरे जाण्यासाठी सर्व प्रभागातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवले जातात. साधारण १५ मे ते १५ आॅक्टोबर या कालावधीत हे कक्ष सुरू असतात. तीन पाळ््यांमध्ये काम चालते. प्रामुख्याने पावसाळयात सुरू राहणारे हे आपत्कालीन कक्ष हेच आपत्तीत सापडल्याचे चित्र काही प्रभागांमध्ये यंदाच्यावर्षीही पाहयला मिळत आहेत. केडीएमसीची दहा प्रभाग कार्यालये आहेत. आपत्कालीन कक्ष पथक प्रमुख, सहायक पथकप्रमुख आणि सहा कामगार असा कर्मचारी प्रत्येक प्रभागासाठी देण्यात येतो. परंतु अपुरा कर्मचारी वर्ग ही समस्या बहुतांश प्रभागांमध्ये आहे. प्रामुख्याने सफाई कामगारांवर आपत्ती निवारण करण्याची भिस्त असल्याचे डोंबिवलीतील ग आणि फ कार्यालयातील चित्र होते. विशेष बाब म्हणजे याठिकाणी दिले गेलेले कर्मचारी विविध आजारांनी आणि व्याधींनी त्रस्त असल्याने त्यांच्याकडून आपत्ती निवारण्याची काय अपेक्षा करणार असाही सवाल उपस्थित होत आहे. नियुक्त कर्मचाºयांपैकी मोजकेच कर्मचारी घटनास्थळी दिसतात.
ग आणि फ प्रभाग या दोन्ही प्रभागांच्या आपत्कालीन कक्षासाठी याआधी डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात जागा दिली होती. परंतु ती जागा गैरसोयीची होती. दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेल्या कक्षाच्या भिंतीमधून पावसाचे पाणी झिरपत होते. त्यात छतावर असलेला पत्राही गळका होता. त्यावर ताडपत्री टाकली होती.
आयुक्त गोविंद बोडके यांनी मागील जूनमध्ये केलेल्या दौºयात कक्षातील असुविधा चव्हाटयावर आली होती. त्यानंतर हा कक्ष डोंबिवली विभागीय कार्यालयातील ग्रंथालयाच्या जुन्या जागेत स्थलांतरीत करण्यात आला. सुस्थितीत आणि यंत्रणांनी सज्ज जागा मिळाली याबाबत कर्मचाºयांमध्ये समाधान व्यक्त होत होते. परंतु काही दिवसांतच या स्थलांतर केलेल्या कक्षाच्या जागेला अडगळीच्या सामानांचे हक्काचे ठिकाण केल्याने आजघडीला दुरवस्थेच्या गर्तेत येथील कर्मचारी डयुटी बजावत आहेत. या खोलीत प्रचंड घाण आणि कचरा, धुळीचे साम्राज्य असल्याने डासांचा प्रादुर्भाव, धुळीच्या त्रासाने कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘ह’ आणि ‘ड’ प्रभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्षालाही पुरेशा कर्मचाºयांचा अभाव ही समस्या भेडसावत आहे. महत्वाचे म्हणजे ह प्रभाग कार्यालयाला वाहन देण्यात आले आहे पण चालक नाही. याठिकाणीही व्याधी जडलेले कर्मचारी दिले आहेत. अन्यत्र प्रभाग कार्यालयांमधील आपत्कालीन कक्षाचीही फारशी वेगळी परिस्थिती नाही.
>प्रभाग कार्यालयांचीही झाली दुरवस्था
केडीएमसीची कार्यालयेही सुस्थितीत नाहीत. ‘क’ प्रभाग कार्यालयाची स्थिती पाहता याची प्रचिती येते. हे कार्यालय अन्यत्र हलवण्याचे आदेश आयुक्त गोविंद बोडके यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात दिले होते. परंतु आजतागायत कार्यालय हलवले नाही. ही इमारत साधारण ४२ वर्षे जुनी आहे. याठिकाणी गळती होत असून धोकादायक अवस्थेत असलेल्या या इमारतीमधील पिलरला तडेही तसेच भेगा गेल्या आहेत. तळमजल्याला असलेल्या सुरक्षारक्षकांच्या केबिनलाही गळती लागली आहे. तत्कालीन सभापती मोहन उगले यांनी मोबाइलवर दुरवस्थेचे चित्रण सोशल मीडियावरून निदर्शनास आणले होते. इमारत देखभाल दुरूस्तीसाठी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. परंतु आजच्याघडीलाही कार्यालय ‘जैसे थे’ अवस्थेत असल्याने तेथील कर्मचारी आणि येणाºया नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, मध्यंतरी आधारवाडी अग्निशमन केंद्राच्या जागेच्या ठिकाणी नवीन इमारत बांधून त्यामध्ये अग्निशमन यंत्रणेसह क प्रभाग कार्यालय थाटण्याच निर्णय घेतला. परंतु तो अमलबजावणीअभावी कागदावरच राहिला आहे. सद्यस्थितीला अतिधोकादायक इमारतींमधील पाणी आणि वीज जोडणी तोडण्याची कार्यवाही केडीएमसीकडून जोमाने सुरू आहे. मग आपल्याच जीर्ण अवस्थेत असलेल्या कार्यालयाकडे दुर्लक्ष का? असाही सवाल एकूणच चित्र पाहता उपस्थित होत आहे.
>स्वच्छतागृहात थेंबथेंब पाणी गळे
केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील स्वच्छतागृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. वारंवार याठिकाणी डागडुजी करण्यात आली आहे. याउपरही येथील दुरवस्थेचे चित्र कायम राहिले आहे. विभागीय कार्यालयाचा तळमजला अधिक दुमजली वास्तूत ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग कार्यालये आहेत. यातील तळमजल्यावर ‘ग’ प्रभागाचे कार्यालयांसह दोन्ही मजल्यांवर विवाह नोंदणी कार्यालय आणि तळमजल्यावर नागरी सुविधा केंद्र आहे. त्यामुळे येथे कामानिमित्त येणाºया नागरिकांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे येथील तळमजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहाचा वापर मोठया प्रमाणावर होतो. मात्र सध्या या स्वच्छतागृहाच्या भोवतालची परिस्थिती पाहता या परिसरात रोगराईला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. या अस्वच्छतेमुळे आरोग्यही एकप्रकारे धोक्यात आले आहे. वरच्या मजल्यावरील स्वच्छतागृहाचे पाणी भिंतीमधून खाली झिरपत असल्याने या जलाभिषेकात येणारे-जाणारे चांगलेच बेजार झाले आहेत. २०१५ मध्ये महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर डोंबिवली विभागीय कार्यालयाला भेट दिली होती त्यावेळीही त्यांनी तेथील पाहणी केली होती. त्यानंतर काहीप्रमाणात सुधारणा झाली परंतु परिस्थिती आजच्याघडीला जैसे थे आहे. विशेष बाब म्हणजे विभागीय कार्यालयातील पंप हाऊसही धोकादायक अवस्थेत आहे. तिथेही भविष्यात कोसळण्याची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
>ह प्रभागातही जलाभिषेक
काही प्रभाग कार्यालये बाहेरून सुस्थितीत दिसत असलीतरी आतील खोल्यांमधील गळतीचे सत्र पाहता बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ‘ह’ प्रभाग कार्यालयाची वास्तू २००० मध्ये बांधण्यात आली परंतु प्रवेशद्वारावरील भागातील भिंतीवरील वरच्या बाजूस पाणी झिरपत असताना दुसºया मजल्यावरील कर विभागाच्या कार्यालयातही पाणी गळतीचा त्रास तेथील कर्मचाºयांना होत आहे. अंगावर पाणी झिरपत असल्याने त्याठिकाणी चकक बॅनर लावून पडणाºया थेंबांना अन्यत्र वाट करून दिल्याचे पाहयला मिळते. गेल्या सात वर्षांपासून याठिकाणी असलेल्या गच्चीवर पत्र्याची शेड टाकण्याची मागणी होत असताना त्याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे.
>उल्हासनगरमध्ये अंध, अपंग कर्मचाºयांचा भरणा
पावसाळयापूर्वी महापालिका २४ तास आपत्कालीन कक्षाची स्थापना करते. मात्र या पथकाजवळ साधी कुºहाड, कटर आदी साहित्य नाही. तसेच पथकात वयस्कर कर्मचाºयांचा समावेश असून पथकातील एका कर्मचाºयाला १० फुटावरील दिसत नाही. तर दोन कर्मचाºयांच्या पायात लोखंडी रॉड तर कर्मचारी वयस्कर आहेत, अशी माहिती व्यवस्थापनाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. आपत्कालीनवेळी सर्व मदार अग्निशमन दलावर ठेवावी लागते असेही त्यांनी सांगितले. उल्हासनगरची लोकसंख्या ९ लाख असून १ लाख ८० हजार मालमत्ता आहेत. शहराच्या मधोमध वालधुनी नदी तर रेयॉन सेंच्युरी कंपनी शेजारून उल्हास नदी वाहते. तसेच खेमानी, गुलशननगर, गायकवाड पाडा, सम्राट अशोकनगर नाल्याच्या पुराचा धोका कायम आहे. तसेच धोकादायक इमारतीसह झाडे पडण्याची टांगती तलवार असते. अशावेळी पालिकेने पावसाळयात अद्ययावत आपत्कालीन कक्षासह पथकाची स्थापन करणे आवश्यक असते. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. नावालाच आपत्कालीन कक्षाची स्थापना केली असून १० जणांच्या पथकात नवतरूण व अनुभवी कर्मचाºयांच्या भरती ऐवजी वयस्कर कर्मचाºयांचा भरणा केला. तसेच त्यांची सेवा तीन शिफ्टमध्ये विभागली आहे. अद्ययावत साहित्य दिले नसल्याबद्दल नेटके यांनी नाराजी व्यक्त केली. झाड किंवा इमारत पडल्यास कुदळी, पावडे, कुºहाड, कटर आदी साहित्य नको का? असा प्रश्नही त्यांनी केला. स्वत:च्या पैशाने काही साहित्य खरेदी केल्याचे ते म्हणाले. विभागात ८० टक्के कर्मचारी कंत्राटदारांचे आहेत. केवळ २० टक्के कर्मचारीच महापालिकेचे आहेत.