सभागृहानेच अविश्वास ठराव करुन मला शासनाकडे पाठवावे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे भावनिक आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:37 PM2018-02-20T16:37:44+5:302018-02-20T16:40:10+5:30
शासन माझी बदली करीत नाही, त्यामुळे सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वासाचा ठराव करावा असे भावनिक आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले.
ठाणे - ज्यांनी माझा ब्रॅन्ड अॅम्बेसीडर म्हणून वापर केला, ज्यांच्या नजरेत मी काल पर्यंत हीरो होतो, त्यांनीच मला आज झिरो केले आहे. माझ्यावर वयक्तीक टिका करुन माझ्या बदलीसाठी प्रयत्न केले जात असल्याचा अप्रत्यक्ष टोला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भाजपाला लगावला. परंतु मलाच इथे राहण्याची अजिबात इच्छा नाही, शासन देखील माझी बदली करीत नाही, त्यामुळे आता सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव करावा आणि मला येथून परत पाठवावे. आई शप्पथ या ठरावाला मी कोणताही विरोध करणार नसल्याचे भावनिक आवाहन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले. परंतु एप्रिल पर्यंत बदली झाली नाही तर मी सुट्टीवर जाईन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मंगळवारी महासभा सुरु होताच, मुंब्रा स्टेडीयमचा मुद्यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चांगलेच वातावरण तापले होते. तसेच याच महासभेत भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी पोलिसांना बाईक देण्याच्या प्रकरणावरुन सभा तहकुबी मांडली होती. त्यामुळे प्रशासनातील सर्वच अधिकारी चिंतेत होते. त्यात मुंब्य्राच्या स्टेडीअमवर सुरु असलेल्या वादाच्या वेळेस देखील भाजपाच्या नगरसेवकाने प्रशासनाने मोबाईलवर वाचलेल्या पत्रावर आक्षेप घेतल्याने आयुक्त संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी बदलीसाठी भावनिक आवाहन केले. स्थायी समिती नसल्याने ३५ (अ) नुसार प्रशासकीय वित्तीय मान्यतेचे विषय हे महासभेच्या पटलावर येत असतात. त्यामुळेच महासभेत विषय वाढले जात आहेत. परंतु, त्यातही काही घटक प्रशासनावर बोट ठेवत आहेत हे चुकीचे आहे. तीन वर्षे मी माझे घरदार विसरुन शहराचा विकास व्हावा यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले. परंतु आॅक्टोबर महिन्यात माझ्यावर ज्या पध्दतीने वयक्तीक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच मी व्यतीथ होतो. त्यामुळे माझी बदली व्हावी यासाठी मी प्रयत्न करीत होतो. परंतु माझी बदली झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. काही घटकांनी माझ्या विरोधात वातावरण तयार करुन मला बदनाम करण्याचे कारस्थानही रचले. काहींनी तर माझी बदली व्हावी यासाठी प्रयत्न देखील केले. तीन वर्षात ज्या घटकांनी माझा वापर ब्रॅन्ड अॅम्बेसीडेर म्हणून केला, ज्यांनी मला हिरो ठरविले. त्याच लोकांनी माझ्यावर वयक्तीक टिका करुन एका क्षणात झिरो ठरविल्याचा अप्रत्यक्ष टीका त्यांनी भाजपावर केली. मला हुकमशहा, औरंगजेब अशी देखील माझ्यावर टिका झाली. मी संवेदनशील असल्याने मला याचे दुख होत आहे. माझी इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मला त्याचे सर्वात जास्त दुख होत असल्याचेही त्यांनी सांगितले. भांडणे कोणाची नाही होत, माझे देखील सभागृहातील सदस्यांबरोबर कित्येक वेळेला भांडण झाले आहे. परंतु मी कधीही ते वयक्तीक पातळीवर नेले नाही. परंतु माझ्या विरोधात काही घटक अशा पध्दतीने कृत्य करीत असले तरी जनतेच्या मनात माझे रिपोर्ट कार्ड तयार आहे. त्यामुळे मला टिकेची मुळीच चिंता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुळात मलाच येथे राहयाचे नाही, त्यासाठी आजपासूनच मी सुट्टीवर जाणार होतो. परंतु रात्री मला एकाने आश्वासन दिल्याने मी सुट्टी रद्द केली आहे. परंतु एप्रिल पर्यंत माझी बदली झाली नाही, तर मात्र जो पर्यंत माझ्या बदलीची आॅर्डर येत नाही, तो पर्यंत मी सुट्टीवर जाईन असा इशाराही त्यांनी दिला. शासन माझी बदली करीत नाही, त्यामुळे आता सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठरुन करुन मला शासनाकडे पाठवावे, आई शप्पथ जे असा ठराव करतील त्यांचे मी मनापासून आभार मानने असेही त्यांनी यावेळी सांगितले.