निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या जागेवर स्मशानभुमी होणार नाही, स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडला पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:21 PM2018-04-19T16:21:46+5:302018-04-19T16:21:46+5:30
स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. आता रामबाग आणि निसर्ग उद्यानच्या मागील जागेत स्मशानभुमी उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या स्मशानभुमीच्या मुद्यावरुन रंगलेल्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील वादही मिटला आहे.
ठाणे - मागील दिड महिन्यापासून निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निळकंठच्या ऐवजी निसर्ग उद्यानाच्या मागील बाजूचा अॅमीनीटी प्लॉट, युनिक शांती आणि टीएमटी डेपोच्या मागील जागेचा पर्याय पुढे आला आहे. तर रेप्टॉकॉसच्या ऐवजी रामबागच्या अस्तित्वातील स्मशानभुमीसाठी रस्ता विकसित करण्याबरोबर येथील बाधीतांच्या पुनर्वसनाची हमी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी दिली. त्यामुळे आता स्मशानभुमीचा वाद अखेर संपुष्टात आला आहे.
ठाणे शहरातील पोखरण रोड नं.१ व पोखरण रोड नं.२ परिसरातील स्मशानभूमी संदर्भात गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव, स्थानिक नगरसेवक, आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह स्थानिक नागरीकांचे शिष्ठ मंडळ उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेअंती, निळकंठ येथील जागेवर स्मशानभुमी होणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्या ऐवजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निसर्ग उद्यानाच्या जवळ असलेल्या १६०० चौरस मीटरच्या सुविधा भुखंडाचा, तसेच युनिक शांती येथील १२०० चौरस मीटरच्या रहिवास क्षेत्राच्या ठिकाणची जागा आणि टीएमटी डेपोजवळील जागा देखील पर्याय म्हणून पुढे ठेवण्यात आली आहे. या पैकी कोणतीही एक जागा लवकर अंतिम झाल्यास त्याठिकाणी स्मशानभुमी उभारली जाईल असे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. दुसरीकडे वर्तक नगर भागातील रेप्टॉकॉस जागे ऐवजी, रामबाग स्मशानभुमीच विकसित केली जाईल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी दिला. परंतु येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे मत आमदार सरनाईक यांनी व्यक्त केले. परंतु लोकप्रतिनिधींचे सहकार्य असेल तर त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता जुन पर्यंत का होईना तयार केला जाईल असा ठाम विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. त्यामुळे रेप्टॉकॉसचा प्रस्ताव देखील मागे पडला आहे. एकूणच आता निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या जागेवर स्मशानभुमी होणार नसल्याचे या बैठकीत पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शहरातील सर्व स्मशानभुमींचा विकास केला जाणार
या बैठकीच्या अनुषंगाने शहरातील महत्वाच्या स्मशानभुमींचा विकास केला जावा, त्या अत्याधुनिक प्रदुषण विरहित करण्यात याव्यात यावर देखील एकमत झाले. त्यानुसार मानपाडा, वागळे, कावसेर, डवले, पाणखंडा, ब्लुरुफच्या मागील बाजूस असलेली स्मशानभुमी, पारसिक खारेगाव, दिवा, दातीवली आदींसह शहरातील इतर सर्वच स्मशानभुमींचा विकास केला जाणार आहे.
राजकीय वाद नव्हताच...
निळकंठ स्मशानभुमीच्या मुद्यावरुन मागील काही दिवस शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. बिल्डरांशी असलेल्या संबधांमुळेच स्मशानभुमीला विरोध होत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला होता. तर रहिवाशांचा या स्मशानभुमीला विरोध असल्यानेच मी देखील विरोध केला होता असे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले होते. परंतु गुरुवारी झालेल्या बैठकीत मात्र आमच्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय वादच नव्हताच अशी स्पष्ट कबुली या दोनही नेत्यांनी दिली.