बांधकाम खात्यात एका अधिकाऱ्याची भर
By admin | Published: June 29, 2015 03:58 AM2015-06-29T03:58:05+5:302015-06-29T03:58:05+5:30
खोपोली पालिकेच्या विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याने बांधकाम खात्यात आणखी एक अधिकारी पाठवून या शहराच्या विकासासाठी जणू वाटेकरी पाठविला आहे, अशी चर्चा सर्वत्र आहे.
वावोशी : खोपोली पालिकेच्या विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याने बांधकाम खात्यात आणखी एक अधिकारी पाठवून या शहराच्या विकासासाठी जणू वाटेकरी पाठविला आहे, अशी चर्चा सर्वत्र आहे. नगराध्यक्ष दत्ता मसूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत राज्य शासनाचा निर्णय मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांनी वाचून दाखविला. तेव्हा सभागृहात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी चर्चेत भाग घेताना विरोध दर्शविला तर काहींनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.
पालिकेत मुख्य अभियंता व दोन सहाय्यक अभियंता ही पदे कार्यरत असताना मुख्य अभियंता या पदासाठी राज्य शासनाने दीपक जाधव यांची पुन्हा नियुक्ती करून पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीसमोर पेच निर्माण केला आहे. दीपक जाधव यापूर्वी मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. ते केडरमध्ये गेल्याने त्यांची पालघर, जि. ठाणे या ठिकाणी बदली झाली. त्यानंतर जाधव यांनी विशेष प्रयत्न करून आपली केडरमधून मुक्तता केली. त्यानंतर राज्य शासनाने त्यांची मूळ पदावर पुन्हा नियुक्ती करावी, असा आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिला.
खोपोली पालिकेत महत्त्वाचे पत्रव्यवहार या विषयाच्या चर्चेदरम्यान जेव्हा मुख्याधिकारी सावंत यांनी या आदेशाचे वाचन केले तेव्हा सभागृहात काही वेळ चर्चा रंगली. काही सदस्यांनी जाधव यांनीच तत्कालीन मुख्याधिकारी नयन ससाणे यांच्यावर न्यायालयात केस दाखल केल्या, त्या केसेस काढून घ्याव्यात असा आग्रह धरला होती. अखेर मुख्याधिकारी सावंत यांनी जाधव यांना समज दिली जाईल, असे सांगितल्यानंतर त्यांच्या नियुक्तीबाबतच्या चर्चेला विराम मिळाला. (वार्ताहर)