मिशन ‘ब्रेक द चेन’साठी ग्रामीण भागात आरोग्य सर्वेक्षण, कोरोना चाचणी, लसीकरणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:39 AM2021-04-10T04:39:35+5:302021-04-10T04:39:35+5:30
ठाणो : कोरोनाची ही दुसरी लाट गावात पसरू नये यासाठी ग्रामपंचायतींमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना व ‘मिशन ब्रेक द चेन’ ची ...
ठाणो : कोरोनाची ही दुसरी लाट गावात पसरू नये यासाठी ग्रामपंचायतींमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना व ‘मिशन ब्रेक द चेन’ ची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही हाती घेतली आहे. त्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने आरोग्य सर्वेक्षण, कोरोना चाचणी, लसीकरण आणि गृहविलगीकरणावर प्रामुख्याने भर दिला आहे.
ज्या ग्रामपंचायती शहराजवळ आणि लोकसंख्येने मोठ्या आहेत, अशा ग्रामपंचायतीमधील कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी शुक्रवारी ग्रामसेवक आणि सरपंचांशी संवाद साधून गावपाड्यातील स्थितीचा आढावा घेतला. सरपंच तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही केले.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाच हजारांच्या वर कोरोना रुग्णांची भर पडली आहे. याशिवाय मृतांचा आकडाही वाढलेला दिसून आहे. यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाच्या या महामारीला तोंड देण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांना सतत सांगितले जात आहे. त्यास हेळसांड केल्यामुळे सध्याची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. तिला नियंत्रणात आणण्यासाठी जमावबंदी पाठोपाठ रात्रीची संचारबंदी आणि शनिवार, रविवार या प्रशासकीय सुटीच्या कालावधीत शासनाने कडक संचारबंदी सक्तीची केली आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासूनच हा लॉकडाऊन हाती घेतल्यामुळे संध्याकाळी नागरिकांची खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे.