ठाण्याच्या कृषी आराखड्यात भरीव भातउत्पादनावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:41 PM2020-11-09T23:41:36+5:302020-11-09T23:41:46+5:30
शेतकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व त्याच्याशी संलग्न विभागातील तज्ज्ञांनी संशोधन करून हा विस्तार आराखडा तयार केला आहे.
- सुरेश लाेखंडे
ठाणे : केवळ ‘भात’ या प्रमुख पिकाचे उत्पन्न असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कृषीचा तांत्रिक दृष्टीने विकास करून उत्पादनात भरीव वाढ करता यावी, यासाठी कृषीचा पाच वर्षे मुदतीचा ‘यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा’ मंजूर करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यास नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जिल्ह्यातील शेतकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व त्याच्याशी संलग्न विभागातील तज्ज्ञांनी संशोधन करून हा विस्तार आराखडा तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील उपलब्ध कृषी, हवामान, शास्त्रीय परिस्थिती आदींच्या सहा विभागांतील प्रत्येकी एका गावाची निवड या कृषी शास्त्रज्ञांंनी प्रातिनिधिक स्वरूपात करून त्यांना हा कृषी आणि त्याच्याशी संलग्न संशोधन व विस्तार आराखडा तयार करता आला आहे. कृषीतील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ या सर्वांच्या सहकार्याने योग्य धोरणे ठरवून तो तयार केल्याचे माने यांनी लक्षात आणून दिले.
कृषी तंत्रज्ञान, व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा योजनेंतर्गत कृषी व संलग्न विभागांच्या या संशोधन व विस्तार आराखड्याला मान्यता देत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे प्रकाशन केले आहे. या प्रकाशनप्रसंगी माने, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जे.एन. भारती, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास जाधव, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे रवींद्र मर्दाने, नाबार्डचे व्यवस्थापक किशोर पडधान, कृषी विकास अधिकारी एस.पी. काळे, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश पाटील, जिल्हा मृद चाचणी मृद सर्वेक्षण अधिकारी तृप्ती वाघमोडे, उपविभागीय कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, सहायक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण सहायक वनसंरक्षक पी.ए. शिंदे, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक कुसुम दिवेकर आदींच्या उपस्थितीत आत्मा नियामक मंडळ सभेने या आराखड्याला मान्यता देऊन त्याचे ३ नोव्हेंबरला प्रकाशन केले.