ठाण्यातील विविध सामाजिक संस्थांनी मांडलेल्या समस्या प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार –अभिजीत बांगर
By अजित मांडके | Published: January 8, 2024 02:14 PM2024-01-08T14:14:23+5:302024-01-08T14:14:35+5:30
कचरावेचक महिलांना रोजगारासाठी प्राधान्य
ठाणे : ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना शहर विकासाच्या दृष्टीकोनातून ठाणेकरांच्या शहराविषयीच्या सूचनांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सुरू केलेल्या 'माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाचे दुसरे सत्र नुकतेच पार पडले. या सत्रात ठाण्यातील विविध सेवाभावी (अशासकीय) संस्थाचे प्रतिनिधींकडून नागरिक म्हणून शहराविषयी असलेल्या अपेक्षा यावेळी बांगर यांनी जाणून घेतल्या. घरकाम करणाऱ्यां महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर, नाका कामगार, वृद्धाश्रमासाठी जागा, कचरावेचक महिला तसेच किन्नर समूहासाठी रोजगाराच्या संधी अशा विविध विषयांवर सर्वंकष अशी चर्चा करुन या चर्चासत्रात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दयांवर विचारविनिमय करुन निश्चितच मार्ग काढण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करेल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.
या चर्चासत्रात उपायुक्त वर्षा दिक्षीतस्त्री मुक्ती संघटनेच्या संध्या डोंगरे, नीती फाऊंडेशन व मोफत अन्नसेवा देणाऱ्या अर्चना मार्गी, रोटी बँकेच्या मनिषा पाटील, जयश्री फाऊंडेशनचे हरिशभाई गोगरी, वुमन्स वेल्फेअर फाऊंडशेन, शहरी बेघर निवारा केंद्राच्या मीनाक्षी उज्जैनकर, महिला बचत गट कोअर ग्रुपच्या कुंदा घनवटे, कचरावेचक महिलांसाठी काम करणाऱ्या सविता बालटकर, कचरावेचक महिला मंगल प्रधान, सामाजिक कार्यकर्त्यां लक्ष्मीछाया काटे, किन्नर समूहाच्या अमृता सिंग, रेश्मा कांबळे आदी सहभागी झाले होते.
ठाणे शहरात नाका कामगारांची संख्या मोठी असून नाक्यानाक्यावर या कामगारांसाठी शेड उभारण्यात यावी, तसेच त्या ठिकाणी शौचालयाची सुविधा उपलब्ध करणे. घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरासाठी जागा उपलब्ध करुन देणे. शहरात ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी किट उपलब्ध करावीत तसेच सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याबाबतचे मुद्दे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीछाया काटे यांनी उपस्थित केले. याबाबत ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत त्या साईटची यादी घेवून आपण त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करावी असे आयुक्तांनी नमूद केले.
जयश्री फाऊंडेशन गरीब गरजू लोकांना जेवण पुरविते तर त्यांनी आजी आजोबांसाठी शाळा सुरू केली आहे, यासाठी आवश्यक असलेली जागा महापालिकेच्या माध्यमातून द्यावी असे माधुरी पाटील यांनी नमूद केली. तसेच या शाळा शहरातील विविध भागात सुरू केल्यास ज्येष्ठ नागरिकांची शिकण्याची सुप्त इच्छा पूर्ण होण्यास मदत होणार आहे. समाजातील उपेक्षितांचा विकास व्हावा यासाठी स्वयंसेवक नेमून विविध शाळांच्या माध्यमातून काम केल्यास त्याचा फायदा समाजाला होईल व उपेक्षित मुलांच्या समस्याही इतरांना समजतील असेही त्यांनी नमूद केले.
ओळखपत्र द्यावं
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविली जात आहे. गृहसंकुलांतील दैनंदिन कचरा जमा करण्यासाठी कचरावेचक महिलांना नियुक्त करण्यात याव्यात जेणेकरुन त्यांना यामाध्यमातून रोजगार निर्मिती होईल. एकत्रित केलेल्या कच-याचे वर्गीकरण करुन यामधून भंगार स्वरुपात असलेले साहित्य वेगळे केले जाईल, या माध्यमातून देखील त्यांना उत्त्पन्न मिळू शकेल. यासाठी कचरावेचक महिलांना ओळखपत्र देण्यात यावे तसेच प्रती घर ठराविक रक्कम सोसायट्यांना ठरवून दिल्यास या माध्यमातून त्यांना हक्काचा रोजगार मिळेल व त्याचा भार महापालिकेवर पडणार नाही असे सविता वालटकर यांनी नमूद केले तर कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
समाजातील तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी योजना राबविली गेली पाहिजे. आज हा समाज विखुरलेला असल्यामुळे त्यांची निश्चित अशी नोंदणी नाही या मंडळीना रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आदी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महापालिकेने पुढाकार घ्यावा तसेच स्वयंरोजगारासाठी काही कर्ज आवश्यक असल्यास बँकामार्फत अशा प्रकारचे कर्ज उपलब्ध होईल् यासाठी महापालिकेने मदत करावी अशी मागणी किन्नर समूहाच्या अमृता सिंग व रेश्मा कांबळे यांनी केली.
निवारा केंद्र सुरू करण्याची मागणी
शहरातंर्गत सार्वजनिक ठिकाणी अनेक बेघर असल्याचे दिसून येतात यांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने बेघर शहरी निवारा केंद्र सुरू केले असून हे काम वुमन्स वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येते. सद्यस्थितीत अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना आवश्यक व पुरेशा सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जागेची आवश्यकता आहे. तरी अशा स्वरुपाची निवारा केंद्रे शहराच्या इतर भागातही सुरू करण्याची मागणी मीनाक्षी उज्जैनकर यांनी केली.
महिलांचे सक्षमीकरण व गरीब व गरजू महिलांना रोजगार उपल्बध व्हावा यासाठी महिला बचत गटांची स्थापना करण्यात आलेली आहे, या बचत गटांच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तू बनविल्या जातात, परंतु योग्य प्रकारे मार्केटिंग करण्याचे ज्ञान व माहिती नसल्यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात बचत गटांची प्रगती होत नाही यासाठीही महापालिकेच्या माध्यमातून सहकार्य मिळावे अशी मागणी कुंदा घनवटे यांनी केली.
या बैठकीत उपस्थित सर्व संस्थांच्या प्रतिनिधींकडून मांडण्यात आलेल्या मुद्यांचा महापालिकेच्यावतीने विचार करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बचतगटांना चालना देण्यासाठी एकाच प्रकारे उत्पादन करता वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन केले जाईल् यावर भर देण्यात यावा, तसेच काही महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात यावे, जसे रिक्षा चालविणे, संगणक प्रशिक्षण तसेच शाळांना लागणारे गणवेष तयार करणे, सॅनिटरी नॅपकीन बनविणे अशांचा समावेश असावा असेही आयुक्तांनी नमूद केले. समाज विकास विभाग यासाठी पुढाकार घेईल, तसेच भांडारगृह विभागात लागणाऱ्या वस्तू देखील बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध करुन घेता येतील का ते पाहून अशा बचतगटांना काम दिल्यास उत्पन्नाचा वेगळा मार्ग निर्माण होईल असेही आयुक्तांनी नमूद केले. तसेच या बैठकीत किन्नराच्या नोंदणीसंदर्भात 'शासन आपल्या दारी' या उपक्रमातंर्गत विशेष कार्यक्रम राबवून किन्नरांची नोदंणी करणे, तसेच रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड उपलब्ध होईल या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.