घाणीचे साम्राज्य, कसाऱ्यातील असुविधांनी प्रवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:22 AM2018-08-31T05:22:54+5:302018-08-31T05:23:16+5:30
रेल्वेच्या जागेत घाणीचे साम्राज्य : प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास
कसारा : कसारा रेल्वेस्थानकाला आदर्श रेल्वेस्थानकाचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचा कायापालट करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. या घोषणांच्या अंमलबजावणीस सहा महिन्यांपासून सुरुवात झाली असली, तरी याअंतर्गत फलाटावरील पत्रे, पंखे, वगैरेचे काम करण्यात आले. मात्र, फलाट क्र. १ आणि फलाट क्र. ४ वरील स्वच्छतागृहाची दुरुस्ती अथवा स्वच्छता याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे.
याप्रकरणी अनेक महिला प्रवाशांसह पुरुष प्रवाशांनीदेखील रेल्वे तसेच आरपीएफकडे तक्रारी केल्या, परंतु त्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. त्याचपाठोपाठ कसारा रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र. ४ लगत सरकता जिना बसवण्यात आला आहे. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी कार्यान्वित असलेल्या या जिन्याभोवतीही अनेकदा टारगट तरुणांची दादागिरी दिसते. याप्रकरणी कल्याण-कसारा प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी कसारा रेल्वे सुरक्षा दलाकडे अनेक तक्रारी केल्या, परंतु अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवाशांचा स्टेशनबाहेर जाण्याचा नेहमीचा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे घाईगडबडीत बस, टॅक्सी पकडण्यासाठी धावपळ करणाºया प्रवाशांना आता एका बोगद्यातून प्रवास करावा लागतो. मात्र, हा बोगदा खूपच अरुंद असल्याने गर्दीच्या वेळी येथे चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता आहे. तर, दुसरीकडे या बोगद्यातून बाहेर पडताना प्रवाशांना डोक्यावर छत्री घ्यावी लागते, तर तोंडावर स्कार्प किंवा रूमाल बांधावा लागतो. बोगद्यातील अस्वच्छता, टपटप पडणारे पाणी प्रवाशांना हैराण करतेच, परंतु बोगद्याबाहेर आल्यावर रेल्वेच्या जागेत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसते. डम्पिंग ग्राउंडच असल्याप्रमाणे येथे कचºयाचा डोंगर आणि दुर्गंधी यामुळे प्रवासी त्रस्त होतात.
कसारा रेल्वेस्थानकात अस्वच्छ शौचालय व फलाटांसह सरकत्या जिन्यांवर असलेल्या टपोरी तरुणांचा घोळका यावर कसारा स्टेशन मॅनेजर तसेच रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
- राजेश घनघाव, अध्यक्ष, के ३ प्रवासी संघटना
कसारा रेल्वेस्थानकात महिलांसह वयोवृद्ध व अपंग प्रवाशांची कायम कुचंबणा होत असून स्वच्छतागृह असून नसल्यासारखे आहे तसेच स्टेशनबाहेरदेखील मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्याने प्रवास करणे जिकिरीचे आहे.
- क्लेरा फॉलकॉन, प्रवासी
स्थानकातील स्वच्छतागृह आणि स्टेशनबाहेरील घाणीचे साम्राज्य याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी के. जैन यांच्याशी संपर्क केला असता प्रतिक्रिया देण्यासाठी ही आॅफिशिअल वेळ नसल्याचे कारण देत उडवाउडवीची उत्तरे दिली.