उत्तन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:42+5:302021-07-24T04:23:42+5:30
मीरा रोड : सार्वजनिक ठिकाणांच्या साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची असताना उत्तन समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात लाटांनी वाहून आलेल्या कचऱ्याकडे महापालिकेने ...
मीरा रोड : सार्वजनिक ठिकाणांच्या साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची असताना उत्तन समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात लाटांनी वाहून आलेल्या कचऱ्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे.
शहरातील दैनंदिन कचरा उचलणे व साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. या कामासाठी महापालिकेने कोट्यवधींचे कंत्राट दिले आहे. सध्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, जेणेकरून समुद्राच्या लाटांनी उत्तनच्या किनाऱ्यावर विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात वाहून आला आहे. किनाऱ्यावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपासून कचरा किनाऱ्यावर तसाच पडून असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गोळा झालेल्या कचऱ्यामुळे मच्छीमारांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा होत आहे. जाळी विणणे, बोट दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामांत व्यत्यय येत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
संपूर्ण शहराचा कचरा आणून उत्तनमध्ये पालिका टाकते. या कचऱ्याच्या बेकायदा डम्पिंगमुळे आधीच नागरिक हैराण झाले आहेत. संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकणाऱ्या महापालिकेला उत्तन-पाली समुद्रकिनारी साचलेले कचऱ्याचे ढीग साफ करावेसे वाटत नाही, हे संतापजनक असल्याचे स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी म्हटले आहे.