गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना हवी महिनाभरापेक्षा जास्त सुटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 01:25 AM2020-08-11T01:25:05+5:302020-08-11T07:41:18+5:30
परतल्यावरही १४ दिवस क्वारंटाइन सक्तीचे होणार; ठाण्यातील कोकणवासीयांना चिंता
ठाणे : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आधीच गावी १० दिवसांचे क्वारंटाइन सक्तीचे असताना, मुंबई महापालिकेने चाकरमान्यांना परतल्यावरही पुन्हा १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. त्याच धर्तीवर आता ठाणेकरांनाही परत आल्यावर १४ दिवस होम क्वारंटाइन सक्तीचे होते की काय, अशी चिंता सतावत आहे. ठाणे महानगरपालिकेनेही तसाच निर्णय घेतल्यास चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी १0 दिवस, गावी क्वारंटाइन होण्यासाठी १० दिवस आणि परतल्यावर पुन्हा क्वारंटाइन होण्यासाठी १४ दिवस अशा तब्बल ३४ दिवसांच्या सुटीचे नियोजन करावे लागणार आहे.
चाकरमान्यांना कोकणात गणेशोत्सवाकरिता जाण्यासाठी एसटी बसेसची सोय केल्यावर मोठ्या संख्येने चाकरमानी आरक्षण करून कोकणात पोहोचत आहे. गणेशोत्सव करून हा चाकरमानी पुन्हा मुंबईतही परतेल. परंतु, परराज्य किंवा परजिल्ह्यांतून मुंबईत येणाऱ्यांना क्वारंटाइन सक्तीचे केले, तरच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणणे शक्य होऊ शकते. त्यामुळे कोकणात जाणाºया ठाणेकरांनाही क्वारंटाइनची सक्ती करणाºया ठाणे महानगरपालिकेने गणेशोत्सव आटोपून आल्यावर आणखी १४ दिवस घरीच बसवले तर काय होणार, या विचाराने ठाणेकर चिंताग्रस्त झाले आहेत. अनलॉकमध्ये काही उद्योग, कार्यालये सुरू झाली आहेत. आधीच नोकºयांची शाश्वती नसताना गणेशोत्सवाहून परतल्यावर पुन्हा १४ दिवसांची सुटी मिळणे शक्य नाही. गणेशोत्सवापेक्षा क्वारंटाइनचेच दिवस जास्त होत असल्याने चाकरमानी टेन्शनमध्ये आहेत.
कोकणात जाणाºयांसाठी सरकारने १0 दिवसांचे होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. मात्र, कोकणातील अनेक ग्रामपंचायतींनी क्वारंटाइनसाठी १४ दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. त्यामुळे गावी १४ दिवस क्वारंटाइन, गणेशोत्सवाचे पाच किंवा १0 दिवस आणि पुन्हा इथे येऊन १४ दिवस क्वारंटाइन व्हायचे म्हणजे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा महिनाभरापेक्षाही जास्त कालावधी लागणार आहे.
- दीपेंद्र नाईक, ठाणे
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी क्वारंटाइनची सक्ती करणे समजण्यासारखे आहे. पण, मग सगळ्यांना सारखा नियम असला पाहिजे. मुंबई सोडून पळालेले अनेक जण पुन्हा कामाच्या शोधात मुंबईत परतू लागले आहेत. ते सक्तीने क्वारंटाइन होतात की नाही, हे पाहण्याची तसदी कुणीही घेत नाही. मग, गणेशोत्सवासाठी जाणाºयांनाही सक्ती नसावी.
- रोहिणी चेंदवणकर, ठाणे
क्वारंटाइनचा नियम सर्वांच्याच भल्यासाठी आहे. बाहेरगावहून आलेल्या व्यक्तीने १४ दिवस होम क्वारंटाइन झालेच पाहिजे, असे निर्देश सरकारने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार, ठाणेकरांनीही गणेशोत्सवाहून परतल्यावर स्वत:हूनच १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे. त्यासाठी आणखी वेगळा निर्णय घेण्याची गरज नाही.
- संदीप माळवी, उपायुक्त,
ठाणे महानगरपालिका