भिवंडी महापालिकेमधील कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:36 PM2020-09-26T23:36:39+5:302020-09-26T23:36:51+5:30
धोकादायक इमारतींत वास्तव्य । ५२५ कुटुंबांसमोर उभा आहे मृत्यू
नितीन पंडित।
भिवंडी : भिवंडीतील तीन मजली जिलानी इमारत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झाले होते. शहरात ७८२ अतिधोकादायक इमारती आजही उभ्या असून रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. अगदी पालिका कर्मचारीही धोकादायक इमारतीत राहत असून ५२५ कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. वेळीच या कर्मचाºयांची अन्य ठिकाणी सोय न केल्यास जिलानीसारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती-१ ते ५ मध्ये पालिका कर्मचारी व अधिकाºयांसाठी ४६ निवासस्थाने आहेत. त्यांची सध्या दुरवस्था झाली असून ही निवासस्थाने धोकादायक स्थितीत असून पालिकेने त्यांना वारंवार नोटीस दिल्या, मात्र त्यांच्या राहण्याची सोय करण्याबाबत पर्याय शोधला नसल्याने निवासस्थाने रिकामी करण्यास कर्मचारी तयार नाहीत. शहरातील संगमपाडा येथील कर्मचारी वसाहतीत सुमारे १७२ कुटुंबे आहेत. कोंबडपाडा (५६ कुटुंबे), पद्मानगर (७२ कुटुंबे), धामणकरनाका फायर ब्र्रिगेड (१० कुटुंबे), वाजमोहल्ला (३२ कुटुंबे), वॉटर सप्लाय पद्मानगर (३६ कुटुंबे), कोटरगेट आझाद गार्डन (३२ कुटुंबे), भय्यासाहेब आंबेडकरनगर (१२ कुटुंबे), शिवाजीनगर भाजी मार्केट (४८ कुटुंबे), मिल्लतनगर, कामतघर, पद्मानगर प्रेमाताई हॉल, भावना मंगल कार्यालय ताडली, फेणेगाव, शास्त्रीनगर (१९ कुटुंबे), अजयनगर (१० कुटुंबे), फायर ब्रिगेड कासारआळी (८ कुटुंबे) अशी सुमारे ४६ निवासस्थाने कर्मचाºयांसाठी आहेत.
विशेष म्हणजे यातील अनेक इमारती ३० ते ४० वर्षे जुन्या असून सध्या त्यांची दुरु स्ती न झाल्याने त्या दुरवस्थेत आहेत. अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या घरांची व इमारतींची आयुक्त व पालिका अधिकाºयांनी पाहणी केली, मात्र तोडगा काढण्यास असमर्थ ठरल्याने ही निवासस्थाने आजही तशीच आहेत.
प्रशासनाने या इमारतींवर दुरु स्तीच्या नावावर कोट्यवधी खर्च केला आहे. बहुतांश ठिकाणी प्लास्टर निघाले आहेत, तर काही इमारतींवर झाडे उगवली आहेत.
तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
कर्मचाºयांनी बांधकाम व उद्यान विभागाकडे तक्र ारी केल्या आहेत. मात्र, ती झाडे तोडली गेली नसल्याने इमारत कमकुवत झाली आहे, अशी माहिती कामगार संघटनेचे कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीचे महेंद्र कुंभारे, भानुदास भसाळे, श्रीपत तांबे, संतोष चौहान, भारत तांबे यांनी दिली आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, अशी माहिती कृती समितीच्या सदस्यांनी दिली.