ग्लोबलमधील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:27+5:302021-08-21T04:45:27+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबतीत अद्यापही निर्णय होत नसून त्यांच्या ठेकेदाराला सध्या २५ ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबतीत अद्यापही निर्णय होत नसून त्यांच्या ठेकेदाराला सध्या २५ टक्केच रक्कम दिली जात असल्याने त्याने या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी गेटच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सकाळी गेटजवळच बसून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सना मुदतवाढ द्यायची का नाही, याबाबत अद्याप प्रशासकीय पातळीवर निर्णय झालेला नाही, त्यातही रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेकडून ठेकेदाराला २५ टक्केच रक्कम अदा केली जात आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांचा पगार कुठून द्यायचा, असा पेच त्याच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळेच त्याने शुक्रवारी कर्मचाऱ्यांना गेटवरच थांबवून आजपासून कामावर येऊ नका, असे सांगितले. एकदा गेटच्या बाहेर गेलो की पुन्हा आतमध्ये प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे पुन्हा एकदा सर्व डॉक्टर्स आणि नर्सने गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा गुरुवारी निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु, तो झाला नाही.
.........
कंत्राटी स्वरूपात या कर्मचाऱ्यांना घेतले होते. तसेच रुग्णसंख्या कमी झाल्याने ठेकेदाराला २५ टक्केच पैसे दिले जात आहेत. त्यामुळे अधिकच कर्मचारी ठेवणे त्यास अशक्य आहे. त्यातही २५ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्ण असतील आणि अधिकचे पैसे ठेकेदाराकडून घेतले जात असतील तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आता मानवतेच्या दृष्टिकोनातून काही करता आले तर तसा विचार केला जाईल.
(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)