आरोग्य केंद्रातील कर्मचारी मानधनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:54 PM2019-06-19T22:54:57+5:302019-06-19T22:55:07+5:30
मीरा-भाईंदर पालिकेचा भोंगळ कारभार; घरखर्च चालवणे कठीण
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णालय व आरोग्य केंद्रांवर ठोक मानधनावर सेवा बजावणारे वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांना मुदतवाढ संपल्याने तब्बल चार ते पाच महिने मानधनापासून वंचित आहेत.
पालिकेचे मीरा रोड येथे भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय, तर भाईंदर येथे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आहे. याशिवाय, पालिकेची शहरात आरोग्य केंद्रे आहेत. २०१६ पासून टप्प्याटप्प्याने वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आदींची ठोक मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुदत २८ डिसेंबर २०१८ ते १५ मार्च २०१९ अशी काही टप्प्यांमध्ये संपत असल्याने त्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती नोव्हेंबर २०१८ मध्ये दोनवेळा वैद्यकीय विभागाने केली होती. परंतु, आस्थापना विभागाने घातलेला घोळ, त्यातच वरिष्ठ अधिकाºयांसह सत्ताधाºयांनी केलेली डोळेझाक यामुळे अधिकारी, कर्मचाºयांच्या मुदतवाढीचा प्रस्तावच तयार होऊन स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला नाही.
डिसेंबर २०१८ पासून मार्च २०१९ पर्यंतचा कालावधी प्रशासन आणि सत्ताधाºयांनी वाया घालवला. त्यानंतर, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने अधिकारी, कर्मचाºयांना मुदतवाढच देता आली नाही. मुदतवाढ नसल्याने आस्थापना विभागाने त्यांचे मानधनच काढले नाही. त्यामुळे चार ते पाच महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी मानधन मिळत नसतानाही काम केले. मानधनाअभावी घरखर्च चालवणे जिकिरीचे झाले आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत कर्मचाºयांना मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर झाला असला, तरी अजूनही त्यांना थकीत मानधन मिळालेले
नाही.
लवकरच मानधन दिले जाईल
प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी मात्र आचारसंहितेमुळे मुदतवाढ प्रलंबित होती, असे सांगत स्थायी समितीने ठराव मंजूर केल्याने लवकरच सर्व कर्मचाºयांचे मानधन दिले जाईल, असे सांगितले.