‘मफतलाल’च्या कामगारांची देणी चार महिन्यांत मिळणार
By admin | Published: May 4, 2017 05:53 AM2017-05-04T05:53:51+5:302017-05-04T05:53:51+5:30
न्यायालयाच्या निर्णयामुळे मफतलाल कंपनीच्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीची कळव्यातील जमीन
ठाणे : न्यायालयाच्या निर्णयामुळे मफतलाल कंपनीच्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीची कळव्यातील जमीन विकण्यास न्यायालयाने मंजुरी दिली असून ही प्रक्रिया पूर्ण होऊन अंदाजे चार महिन्यांत कामगारांना त्यांची थकीत देणी मिळणार आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने कामगारांचा २८ वर्षांचा वनवास संपुष्टात येणार आहे.
कळव्यातील मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर येथील ३३०० कामगार संकटात सापडले होते. कंपनी बंद झाल्यानंतर थकीत देणी रक्कम मिळावी, यासाठी कामगारांनी लढा सुरू केला. हा लढा तीव्र करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी कामगारांनी संघर्ष समितीची स्थापना केली. समितीचा लढा यशस्वी होण्याच्या टप्प्यात असतानाच जिल्हा प्रशासनाने कायद्यावर बोट ठेवून कंपनीच्या १२४ पैकी ६३ एकर जमिनीचा ताबा घेतला. त्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळण्यात अडथळा निर्माण झाला. अशा परिस्थितीत ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास यश मिळाले. मफतलाल कंपनीच्या जमीनविक्रीस परवानगी देणारे पत्र शासनाने उच्च न्यायालयात सादर केले. उच्च न्यायालयानेही जमीनविक्रीस परवानगी दिल्याने कामगारांची थकीत देणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कंपनीच्या जमीनविक्र ीच्या प्रक्रि येस आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर, कामगारांना सुमारे आठ ते १५ लाखांपर्यंत थकीत देणी मिळण्याचा अंदाज असल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
लढा यशस्वी झाल्यानंतर आता श्रेयासाठी वाद
कामगारांसाठी संघर्ष समिती गत ६ वर्षांपासून लढा देत आहे. हा लढा यशस्वी झाल्यानंतर बम्बई मजदूर युनियन या लढ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे पदाधिकारी किरण मोहिते आणि रवींद्र वळामे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मुंब्य्रातील नगरसेवक राजन किणे आणि आमदार संजय केळकर यांच्या सहकार्यामुळे समितीचा लढा यशस्वी झाला, असेही त्यांनी सांगितले. बम्बई मजदूर युनियनचे सचिव संजय वढावकर यांनी न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. त्यामुळेच आम्ही कायदेशीर लढ्याकडे लक्ष केंद्रित केले होते. संघर्ष समितीने चार वर्षांत चार वेळा नेते बदलले. मजदूर युनियनने कामगारांच्या समस्येचे कधीही राजकारण केले नसल्याचे स्पष्ट करून वढावकर यांनी कामगारांच्या लढ्यास साथ दिल्याबद्दल आ. केळकरांचे आभार मानले.