बँक खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांची ठाण्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 22:07 IST2020-09-13T22:00:22+5:302020-09-13T22:07:55+5:30
खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध बँक आॅफ महाराष्टÑच्या अखिल भारतीय कर्मचारी संघटनेने ठाण्यासह देशभरात ७० ठिकाणी विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने केली. तसेच ‘देशातील राष्टÑीयकृत बँकांच्या विकासासाठी आणि रक्षणासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करु,’ अशा आशयाची यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी शपथही घेतली.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी घेतली चांगली सेवा देण्याची शपथ
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध बँक ऑफ महाराष्ट्रच्या अखिल भारतीय कर्मचारी संघटनेने ठाण्यासह देशभरात ७० ठिकाणी विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने केली. तसेच ग्राहकांना चांगली सेवा देण्याची एकत्रितपणे रविवारी शपथही घेतली.
बँक ऑफ महाराष्ट्र या महाबँकेचा सध्या ८६ वा स्पापना दिवस देशभर १३ ते २० सप्टेंबर या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीयकरण संवर्धन सप्ताह म्हणूनही साजरा होत आहे. खासगीकरणामुळे बँकांची लोककल्याणकारी भूमीका दूर सारली जाणार आहे. सध्याचे सरकार हे आत्मनिर्भरतेचा नारा देत या महाबँकेचे सार्वजनिक क्षेत्र हे चारित्र्य दूर सारत मालकी खासगी लोकांना विकण्याचा घाट घालत आहे. याचाच ठाण्यातील वागळे इस्टेट येथील बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठाणे, पनवेल आणि नवी मुंबईतील बँक कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी निषेध नोंदविला. बँकेला ५१ वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे. बँकेची चांगली कामगिरी आहे. मग हा खासगीकरणाचा घाट कशासाठी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी बँक राष्ट्रीयकृत असल्यामुळे कशाप्रकारे सामान्य नागरिकांना चांगली सेवा देऊ शकते, त्याचे महत्व काय? याबाबतची माहिती बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, मुंबईचे संघटन सचिव अरविंद मोरे यांनी कर्मचा-यांना दिली. यावेळी संघटनेचे महासचिव नागेश नाचणकर आणि अध्यक्ष आर. एन. पाटील यांच्यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते.
* यावेळी बँक कर्मचा-यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातूनही ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला. तसेच ‘देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या विकासासाठी आणि रक्षणासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करु,’ अशा आशयाची यावेळी या सर्व कर्मचा-यांनी शपथही घेतली.