सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांमुळे पालिका होतेय रिकामी, २०१९ मध्ये अर्धी महापालिका होणार रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:52 PM2018-06-12T17:52:19+5:302018-06-12T17:52:19+5:30
मागील काही वर्षापासून ठाणे महापालिकेत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. येत्या २०१९ मध्ये तर अर्धी महापालिका रिकामी होणार आहे. ज्या पध्दतीने कर्मचारी सेवा निवृत्त होत आहे, त्यापध्दतीने भरती मात्र होतांना दिसत नाही.
ठाणे - ठाणे महापालिकेत मागील तीन वर्षापासून सेवा निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागील महिन्यात तर एकाच दिवशी म्हणजेच ३१ मे रोजी तब्बल ८५ कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. ही गळती २०१९ मध्ये अधिक वाढणार आहे. त्यामुळे कर्मचारी, वरीष्ठ अधिकाऱ्यांची ही पोकळी निर्माण होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील महिन्यात एकाच दिवशी ८५ कर्मचारी सेवा निवृत्त झाले. या निवृत्तांच्या यादीत कळवा हॉस्पिटलमधील ६ जणांचा समावेश आहे. पावसाच्या तोंडावर कमी पडणारे मनुष्यबळ त्रासदायक ठरणार आहे. वास्तविक पहाता एवढ्या मोठ्या संख्येत कर्मचारी अधिकारी निवृत्त क्षमतेवरून दिसून येत आहे. वास्तविक पहाता या जागा निवृत्त होण्यापूर्वीच ६ महिने आधीच नव्या जागा भरणे
ेबंधनकारक आहे. ठामपात या गोष्टी मात्र नेहमीच उडवाउडवीच्या असतात. त्याचा फटका आता पालिकेला येत्या वर्षभरात आणखी तीव्र स्वरुपात बसण्याची चिन्हे आहेत. येत्या २०१९ मध्ये अर्धी महापालिका सेवा निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे रिती होणार आहे. आताच एका एका वरीष्ठ अधिकाऱ्याला तीन ते चार विभागांचा चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढतांना दिसत आहे. ठाणे महापालिकेत २०१५ मध्ये १३८ वर्ग १ ते ४ मधील अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले होते. तर १० जणांनी स्वेच्छा निवृत्ती स्विकारली होती. २०१६ मध्ये निवृत्तीचा आकडा हा १५० वर गेला. तर स्वेच्छा निवृत्तींची संख्या २५ होती. तर २०१७ मध्ये १९३ आणि स्वेच्छा निवृत्तीचा आकडा हा ३० एवढा होता. त्यानुसार २०१५ मे २०१८ अखेर पर्यंत तब्बल ६६६ कर्मचारी, अधिकारी हे सेवा निवृत्त झाले आहेत.
ठाणे महापालिकेने सरळ सेवेने भरलेली पदे
एकीकडे ठाणे महापालिकेत मागील काही वर्षात सेवानिवृत्तीचे प्रमाण वाढत असतांना दुसरीकडे या कालावधीत ६३९ पदे ही सरळ सेवेने भरली आहेत. यामध्ये २०१५ मध्ये १३१, २०१६-१७ मध्ये २७४ आणि २०१७-१८ या कालावधीत २३४ पदे भरलेली आहेत. यामध्ये वर्ग ४ पदांचे कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे २६९ हे होते. परंतु भरलेल्या पदांची संख्या ही १६१ एवढी आहे.
६२९ कर्मचाऱ्यांना दिली पद्दोन्नती
ठाणे महापालिकेने २०१५ ते २०१७ या कालावधीत ६२९ कर्मचारी, अधिकाऱ्यांना पद्दोन्नती दिली आहे. यामध्ये २०१५ मध्ये २८३, २०१६ मध्ये १२५ आणि २०१७ मध्ये २२१ कर्मचाऱ्यांना पद्दोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये २०१६ मध्ये वर्ग एक च्या ०६ आणि २०१७ मध्ये ०४ कर्मचाऱ्यांना पद्दोन्नती देण्यात आली. तर वर्ग दोन मध्ये ५६, वर्ग तीनच्या ४३६ आणि वर्ग चारच्या १२७ जणांना पद्दोन्नती देण्यात आली.