लोकलसेवा कोलमडल्याने नोकरदारांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:04+5:302021-06-10T04:27:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत बुधवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडली. त्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत बुधवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडली. त्याचा फटका ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील नोकरदारांना बसला. पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे लोकल कासव गतीने सुरू सुरू होत्या. मात्र, सकाळी ८ नंतर पावसाचा जोर वाढल्याने सायन येथे पाणी साचले. त्यामुळे सकाळी ९ नंतर ठाण्यापर्यंत लोकल सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. मात्र, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, तर अनेकांची कामावर दांडी झाली.
लोकलअभावी काहीजण डोंबिवली, कल्याण, दिवा, ठाणे स्थानकात अडकून पडले. लोकल पुढे न गेल्याने कल्याण ते ठाण्यादरम्यान लोकलचा वेग मंदावला होता. त्यामुळे ठाणे गाठायलाही खूप वेळ लागला. त्यात महिला प्रवाशांचे खूप हाल झाले. मर्यादित जागा असल्याने हालचाल करणे कठीण गेल्याने गैरसोय अधिक वाढली. ठाण्यापुढे लोकल न सोडता कर्जत-कसारा दिशेने आलेल्या लोकल ठाण्यातून पुन्हा माघारी चालविण्यात आल्या. यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती, तर सकाळच्या सत्रात मुंबईकडे फार कमी प्रमाणात लोकल सोडण्यात आल्या. तोपर्यंत विविध ठिकाणांहून आलेले प्रवासी परत माघारी नेण्यासाठी रेल्वेने ठाणे-कल्याण मार्गावर अल्पावधीत शटलसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, अनेकांना प्रवासातच दोन्ही दिशांना पाच तास लागल्याने मनस्ताप झाला होता.
रेल्वे स्थानकात बसण्यासाठी आसनव्यवस्था पुरेशी नसल्याने उभे राहण्याशिवाय प्रवाशांपुढे पर्याय नव्हता. पादचारी पुलांवर एखादी लोकल आल्यानंतर गर्दी ओसंडून वाहत होती. दुपारी ३ नंतर ठाणे, डोंबिवली-कल्याण भागात पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. कळवा, दिवा भागात रेल्वे ट्रॅक परिसरात पाणी साचले नसल्याचे सांगण्यात आले.
----------------